फडणवीस यांच्या सूचनेवरून श्री. राज ठाकरे हे शरद पवार व उद्धव ठाकरेंवर टीका करीत आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान वेठीस धरण्याचा त्यांचा हा प्रयत्न ठीक नाही. फडणवीस यांनी शिवरायांच्या मंदिरावरच टीका सुरू केली. शिवरायांचे मंदिर मुंब्य्रात होईल का? असे ते विचारतात. मुंब्रा ते दादर-माहीम सर्वत्र स्वाभिमानाचाच विचार आहे. फडणवीस, तुमचे विषारी राजकारण पराभूत होईल!
ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेकाळी मोगल सत्तेशी लढून पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले व मऱ्हाटा स्वाभिमानाचे पाणी जगाला दाखवले त्याच महाराष्ट्रात शिवरायांशीच वैर घेणारे व दिल्लीचे तळवे चटणारे राजकारणी निर्माण झाले. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अशा सर्वच महाराष्ट्रद्वेष्ट्यांचे मुखवटे गळून पडले. महाराष्ट्र हाच एक धर्म आहे व ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे धर्मयुद्ध आहे. या धर्मयुद्धात कोण कोणाच्या बाजूने उभा राहील ते पाहणे मनोरंजक ठरेल.
नरेंद्र मोदी व अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू अहेत. त्यांना महाराष्ट्रात घुसू देऊ नका, अशी गर्जना करणारे राज ठाकरे हे आता मोदी व शहांच्या गरब्यात सामील झाले व महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा, म्हणजे मोदी-शहा ठरवतील तोच होईल हे मान्य करून भाजपच्या मदतीसाठी ते बाहेर पडले. राज ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना दादर-माहीम विधानसभेतून उभे केले व चि. अमित यांच्या विजयासाठी त्यांना भाजपची मदत हवी. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र आपले उमेदवार उभे केले. श्री. अमित ठाकरे हे तरुण आहेत व त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. राजकारणात जास्तीत जास्त चांगल्या तरुणांनी यावे असे सगळ्यांनाच वाटते. प्रश्न इतकाच आहे की, एक जागा जिंकता यावी यासाठी ‘मनसे’ने भाजपास इतर सर्वत्र मदत होईल अशी भूमिका घेतली.
भाजप आज महाराष्ट्राचा ‘एक नंबर’चा शत्रू आहे हे पहिले व देवेंद्र फडणवीस यांना मदत करणे म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शत्रूंना मदत करणे हे दुसरे. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने येथे राज ठाकरे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली. श्री. राज ठाकरे यांनी शिवसेना फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीचे समर्थन केले. कारण हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घडले. त्याचा आनंद राज ठाकरे यांना झाला असावा. या काळात मुख्यमंत्री शिंदे व राज ठाकरे यांच्यात अनेकदा बैठका झाल्या. एकमेकांकडे जात राहिले, पण राजकारणात राज्यापेक्षा स्वार्थ पुढे रेटला जातो. राज ठाकरे यांना शिंदेंपेक्षा फडणवीस जवळचे वाटतात. कारण ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांची सूत्रे दिल्लीतील शहा-मोदींकडे आहेत व शिंदे यांना राज ठाकरे यांचे वर्चस्व मान्य होणार नाही. शिंदे हे लोकनेते नाहीत व कधीच होऊ शकणार नाहीत. पैशाने जमवलेल्या गर्दीचे तात्पुरते नेते आहेत व फडणवीस-राज ठाकरे एकत्र येऊन आपला काटा काढीत असल्याच्या भयाने ते सध्या पछाडले आहेत. त्यामुळे दादर-माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांच्या चिरंजीवांचा पराभव व्हावा यासाठी ते पुन्हा एकदा गुवाहाटीस कामाख्या देवीचे दर्शन करून परतले असतील.
महाराष्ट्राचा स्वाभिमान वेठीस
एका दादर-माहीम मतदारसंघासाठी राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान पणाला लावला आहे व शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत टीका करीत सुटले आहेत. श्री. राज ठाकरे यांना नक्की काय सांगायचे आहे? याबाबत गोंधळाचे चित्र नेहमीच निर्माण होते. शिवसेना व धनुष्यबाण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच प्रॉपर्टी असल्याचे ते आता सांगत आहेत. ही प्रॉपर्टी बाळासाहेबांची हे त्यांना दोन वर्षांनी समजले व ते बोलून गेले, पण ज्यांनी ही प्रॉपर्टी चोरली व एकनाथ शिंदेंच्या हातावर उदक ठेवावी तशी ठेवली त्या मोदी-शहा-फडणवीस यांच्या समर्थनासाठी राज ठाकरे आज उभे आहेत. हे कसे काय! वंचितांचे राजकारण करणारे श्री. प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे हे उघडपणे मोदी-शहांच्या महाराष्ट्रविरोधी राजकारणावर बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्राची सर्व संपत्ती गुजरातकडे ओढली जात आहे व उद्या महाराष्ट्राला भिकेचा कटोरा घेऊन बिहारप्रमाणे कायम दिल्लीच्या दारात उभे राहावे लागेल, अशी परिस्थिती मोदी-शहांनी निर्माण केली. हे सर्व ज्यांना वेदना देत नाही त्यांच्याकडून महाराष्ट्र कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, पण या हटवादात प्रकाश आंबेडकरांचे जे अकोल्यात झाले त्याच अकोल्याची पुनरावृत्ती दादर-माहीमला होईल हे स्पष्ट दिसते. दादर येथे शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे येथील मतदार उद्धव ठाकरे यांच्याच मागे उभे राहतील. दादर, माहीम, परळ, आपले स्वत्व सोडणार नाही.
शिवरायांची मंदिरे
मालवणातील शिवरायांचा भव्य पुतळा भ्रष्टाचारामुळे उन्मळून पडला. भाजपच्या ठेकेदारांना पैसे खाता यावेत व या पैशांतून निवडणुका लढता याव्यात म्हणून या लोकांनी छत्रपतींनाही सोडले नाही. छत्रपती शिवरायांचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारू व त्यातून जनतेने स्वाभिमानाची प्रेरणा घ्यावी, अशी घोषणा आता उद्धव ठाकरे यांनी करताच या सर्व भ्रष्ट ठेकेदारांचे नेते फडणवीस चिडले व त्यांनी शिवरायांची मंदिरे उभारू या घोषणेची चेष्टा-मस्करी सुरू केली. हे संतापजनक आहे. “हे छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधायला निघाले आहेत. आधी मुंब्य्रात शिवरायांचे मंदिर बांधून दाखवा,” अशी चेष्टेखोर भाषा करणाऱ्या फडणवीस यांच्या पोटातले विष हे असे बाहेर येते. श्री. फडणवीस यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मुंब्रा पाकिस्तानात नाही. ते भारतात व महाराष्ट्रातच आहे व मुंब्य्राच्या प्रवेशद्वारावर शिवरायांचा भव्य पुतळा आहे. दुसरे असे की, त्यांचे मुख्यमंत्री शिंदे हे ज्या ठाणे जिल्ह्यातून येतात, त्यात मुंब्राही आहे. म्हणजे फडणवीस यांनी हे आव्हान शिंदे यांना दिले.
मुंब्य्रात शिवरायांचे मंदिर उभारायचे म्हटले तर कोणीच विरोध करणार नाही. लालबागच्या राजासह अनेक गणेश मंडळांचे स्वागत मुंबईतील सर्वच मुस्लिम मोहोल्ल्यांत होत असते. त्यामुळे धार्मिक दंगली घडविण्याचे भाजपचे मनसुबे बाद होतात. ‘धर्म हा माणसाच्या रक्षणासाठी आहे, तो त्याचा विध्वंस करण्यासाठी नाही,’ अशा आशयाचे जे पत्र त्या काळात छत्रपतींनी औरंगजेबाला पाठविले ते आजही उपलब्ध आहे. फडणवीसांनी ते एकदा समजून घ्यायला हवे. आपल्या कारभारात आणि सैन्यात सर्व धर्मांचे लोक शिवरायांनी घेतले होते आणि म्हणूनच ते महाराष्ट्राच्या शत्रूशी लढू शकले. फडणवीस, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे कोणाशी व कोणासाठी लढत आहेत? हे एकदा महाराष्ट्राला कळू द्या. हे तिघे आतून एक आहेत व त्यांची हातमिळवणी आहे. या भ्रमातून कसे बाहेर पडायचे?
योगींचे ‘बटेंगे…’
महाराष्ट्राच्या मेरू पर्वतास भ्रष्टाचाराच्या मुंग्यांनी पोखरले आहे. भ्रष्टाचाराने सचोटीस गिळावे असा हा मामला निवडणुकीत चर्चेत असताना काळ्या पैशाचे धनी सर्वत्र अरेरावी करीत वावरत आहेत. महाराष्ट्राचे अर्थकारण व प्रतिष्ठा मोडीत काढण्याचा दिल्ली-गुजरातचा उद्योग मराठी प्रजेने रोखायला हवा. राज्याची वाट लागली आहे. ती अधिक लागू नये व ज्यांनी ही वाट लावली त्यांना पुन्हा संधी मिळू नये, या ईर्षेने मतदान व्हायला हवे. उत्तरेचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येतात व त्यांच्या स्वागतासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी पोस्टर्स व घोषणा होतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मोदी-शहा-फडणवीस ही माणसे महाराष्ट्राला परवडणारी नाहीत.
मराठी माणसांत फूट पाडून त्यांना वेगळे राज्य करायचे आहे. राष्ट्राच्या एकतेवर, कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणारे सर्वच जाती-धर्माचे लोक मोदी, शहा, फडणवीस यांचा पराभव करू इच्छितात. त्यांची इच्छा सफल होईल, असे वातावरण आज महाराष्ट्रात आहे. मुंब्य्रापासून दादर-माहीमपर्यंत हेच वातावरण आहे. चिंता नसावी!
@rautsanjay61
[email protected]