राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नकली पक्ष आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत केली. या टिकेला प्रत्युत्तर देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. ‘अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे, तसेच विधान पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूरमधील सभेत केलं होतं. असली कोण आणि नकली कोण? हे अमित शहा ठरवू शकत नाही. तुमच्या हातात पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही एखादा पक्ष खरा की खोटा हे ठरवणार असाल तर, जनता ते सहन करणार नाही. याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत, त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवर अनेकदा आलेले आहात. तेच उद्धव ठाकरे, तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आहे. आपण स्वतः तिथे आला होतात ना? 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला पाठिंबा द्या, हे सांगण्यासाठी आला होतात ना? तेव्हा हीच शिवसेना असली होती. आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यात अडकवून फिरताहेत आणि त्यांना तुम्ही असली म्हणताहेत, हेच गोटे तुमचा कपाळ मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच दोन खरे पक्ष आहेत. बाकी अमित शहा यांनी ज्या डुप्लीकेट पक्षांच्या स्थापना करून अजित पवार आणि शिंदेंना दिलेले आहेत, त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही’, असा खणखणीत इशारा Sanjay Raut यांनी दिला.
आम्ही शरणागती पत्करणार नाही, महाराष्ट्राच्या शत्रूशी लढत राहणार; संजय राऊत यांचा निर्धार
संसद ताब्यात घ्या, पण मित्र पक्षांचा मान राखा, असं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तिकर यांनी केले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी मोदी-शहांवर हल्लाबोल केला. ‘मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही. हा रशिया नाही. इथे पुतीनशाही चालणार नाही. भारताची संसंद आणि भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील, हे इथे लोक आणि मतदार ठरवतील. मोदी, शहा ठरवणार नाहीत. निवडणुकीच्या माध्यमातून, मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल. नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गाने संसद ताब्यात घ्यायची आहे. मात्र या देशाची जनता ते होऊ देणार नाहीत’, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.
‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ हेच कमळाबाईचे धोरण, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
‘पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार भारती कामडी यांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. पण समोर उमेदवार कोण येतोय? या विषयी साशंकता आहे. शिवसेनेतून जे गावित पक्ष सोडून तिकडे गेले आहेत, ते जरी शिंदे गटात असले तरी त्यांना कमळावर निवडणूक लढायची आहे. अद्याप ठाण्यात महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. कल्याणमध्ये गोंधळाचे चित्र आहे. बहुतेक यांचे सर्व उमेदवार भाजप दिल्लीतून जाहीर करेल, असं चित्र आहे. यांच्या हातात काही राहिलेलं नाही, असा भीमटोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.