महाराज, इतिहास समजून घ्या, पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान; संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रत्युत्तर

महाराज, इतिहास समजून घ्या. वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते. त्यांच्या नावाने पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे. एकनाथ शिंदे यांना जयाजीराव शिंदे यांच्या नावाने पुरस्कार द्यायला हरकत नाही. महादजी यांनी दिल्लीपुढे लोटांगण घातले नाही, असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिले आहे.

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या ट्विटसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही. हे जरा आताच्या महाराजांनी समजून घेतले पाहिजे.

एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी आमचं काही म्हणणं नाही, पण कोणाच्या नावाने देताय याला आमचा विरोध आहे. महादजी शिंदे यांच्या नावाने तुम्ही कोणाला पुरस्कार देताय? तुम्ही महादजी शिंदे यांची प्रतिष्ठा कमी केली आहे. तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय, असे संजय राऊत यांनी सुनावले.