गुजरातचे आमदार, मंत्री काय ढोकळा, फाफडा घेऊन आलेत का? संजय राऊत आक्रमक

निवडणूक आयोगाच्या पथकाने यवतमाळमधील वणी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. या तपासणी नाट्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने सगळ्यांना समान न्यायाने वागवावे. अनेक मतदारसंघात गुजरातचे आमदार, मंत्री आलेले असून ते काय हात हलवत आले आहेत की येताना ढोकळा, फाफडा घेऊन आले आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने हेलिपॅड, एअरपोर्ट, रस्ते येथे तपासणी नाके निर्माण केलेले आहेत. हे लोक सामान्य लोकांच्या गाड्या अडवत आहेत. महिलांच्या पर्सची तपासणी करेपर्यंत निवडणूक आयोगाच्या लोकांची मजल गेली. आम्ही त्याच्यावरही आवाज उठवला. काल तर राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हेलिकॉप्टरमधून उतरताना तपासणी झाली. पण ज्यांच्याकडून खोक्यांचे वितरण सुरुय त्यांच्यावर हात टाकला नाही. तपासणी नाके मॅनेज करून त्यांचे पैसे व्यवस्थित पोहोचताहेत.

निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणा तपासण्या करायला हरकत नाही. पण अनेक विधानसभा मतदारसंघात गुजरातचे आमदार, मंत्री आलेले असून ते काय हात हलवत आले आहेत की येताना ढोकळा, फाफडा घेऊन आले आहेत? कोण, कुठे, कसे पैशाचे वाटप करतेय याची माहिती आम्ही वारंवार देतोय. एकनाथ शिंदेंच्या लोकांपर्यंत 25-25 कोटी पोहोचले आहेत. त्यातील काही सांगोल्यात नाक्यावर पकडण्यात आले. गाडी कुणाची, त्यात कोण हे आम्हाला माहिती आहे. 15 कोटी पकडले, पण रेकॉर्डवर 5 कोटीच दाखवले. 10 कोटींचा हिशेब कुठे आहे? असा सवाल राऊत यांनी केला.

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा त्रास दिला जातोय, उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्याप्रकरणी शरद पवार यांची टीका

उद्धव ठाकरे यांची तपासणी करायला आमचा आक्षेप नाही. पण निवडणूक आयोगाने सगळ्यांना समान न्यायाने वागवले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान मोदी, अमित शहांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एका तासासाठी नाशिकला आले होते. तेव्हा त्यांच्या हेलिकॉप्टरमधून 15-16 बॅगा उतरवण्यात आल्या. एका तासासाठी माणूस एवढे कपडे घेऊन जातो का? शिंदे दोन तासांच्या प्रचारासाठी शिर्डीला गेले तेव्हाही त्यांच्या विमानातून बॅगा उतरवण्यात आल्या. याचे व्हिडीओ आम्ही प्रसारित केले. त्या कसल्या बॅगा होत्या? तुम्ही आमच्या तपासण्या करता, यावर हरकत नाही. पण यांच्या तपासण्या कोण करणार? करणार आहेत की नाही? की यंत्रणा विकली गेली, की खोके पोहचले? असा सवाल राऊत यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा प्रचार करत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. दोन्ही पक्ष, दोन्ही नेते महाराष्ट्रात स्वत:च्या स्वार्थासाठी नाही तर गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी मुंबई, महाराष्ट्राची लूट चालवलीय त्याविरोधात संघर्षात उतरले आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातील पक्ष फोडणाऱ्यांच्या बाजुने राज ठाकरे उभे आहेत. त्यांना पाहून मोरारजी देसाई यांची आठवण झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना थोडेसे भान ठेवा. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच, पण महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्या, हल्ला करणाऱ्या गुजरातच्या दोन खतरनाक व्यापाऱ्यांविरुद्ध त्यांची लढाई सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.

हलक्यात घेणाऱ्याचे सरकार पाडले असे बोलणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावरही संजय राऊत यांनी हल्ला चढवला. शिंदे वारंवार सांगतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो. बेळगावच्या आंदोलनात ते कोणत्या तुरुंगात होते तो कागद त्यांनी समोर आणावा. बेळगावच्या तुरुंगात 42 जण होते त्याच्यात एकनाथ शिंदेचे नाव कधीच पाहिले नाही. त्यांनी कधीही कोणतेही आंदोलन केले नाही, हे कधीही तुरुंगात गेले नाही, यांनी कधी एक लाठी खाल्ली नाही. पोलीस आणि ईडीला घाबरून भाजपात गेलेले हे लोक आहेत. यांनी फुशारक्या मारू नये, अशा शब्दात राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला.