शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील घराची दोन अज्ञातांनी रेकी केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. यानंतर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी चौकशीची मागणी केली. दुसरीकडे संजय राऊत यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकार पुरस्कृत झुंडशाही, गुंडगिरी आणि सुपारी उद्योग सुरू आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. सामनाची रेकी होतेय, माझ्या घराची रेकी होतेय, दिल्लीतल्या घराचीही रेकी झाल्याचं समोर आलं आहे. काही लोकांना संतोष देशमुखांसारखा आणखी काही प्रकार करायचा असेल, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला.
अडीच-तीन वर्षापूर्वी नवीन सरकार आलं. त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. सरकार बदलली असलं तरी सगळ्यांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे. किंवा राजकीय सुडाचा प्रकार आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारचा निर्णय कधी घेतला नव्हता. सामना कायम हिटलिस्टवर राहिलेलेलं वृत्तपत्र आहे. 1991 पासून सामनाचा संपादक म्हणून माझी सुरक्षा व्यवस्था कायम राहिली आहे. केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या. शिवसेनेचा नेता, खासदार म्हणून सुद्धा सुरक्षा व्यवस्था असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण गृहमंत्री फडणवीस होते. आम्ही राजकारणात आपल्यावर टीका करतो, आमच्या भूमिका मांडतो म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता. शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता की, तुमच्या जीवितास सुद्धा धोका निर्माण झाला तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. या महाराष्ट्रात अशा प्रकारचं राजकारण कधी घडलं नव्हतं, अशी टीका संजया राऊत यांनी केली.
बाबा सिद्धिकी यांच्या सारख्या एका नेत्याची हत्या झाली. बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली. परभणीत काही प्रकार घडले. महाराष्ट्रातलं वातावरण हे अधिक बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करताहेत, काही फोर्सेस प्रयत्न करताहेत. देवेंद्र फडणवीस नक्षलवादी, नक्षलवादी, नक्षलवादी अशी बोंब सकाळपासून मांडताहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेत नक्षलवादी होते. नक्षलवादी आमच्यापर्यंत पोहोचत नाही. नक्षलवाद्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि त्यांचा बिमोड झालेला आहे, असे देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पण नक्षलवाद्यांपेक्षा सरकारच्या अवती भवती जे लोक आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे त्यांच्यापासून समाजाला जास्त धोका आहे. हे बीडच्या प्रकरणात दिसून आले आहे. सरकारमध्ये सामील झालेले मुख्यमंत्र्यांच्या सभोवती असलेले, गृहमंत्र्यांच्या बरोबर असलेले, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर असलेल्या काही अशा फोर्सेस आहेत, ज्यांच्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडतेय. पण बुहतेक या राज्यातल्या शासन प्रमुखांची अशी इच्छा दिसतेय, जे आमच्या विरुद्ध बोलताहेत किंवा आम्हाला विरोध करताहेत त्यांना गुंड टोळ्यांपासून काही त्रास झाला तर त्याला बहुतेक सरकारची मुक संमती दिसतेय, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
आमच्या घरावरती पाळत ठेवताहेत हे प्रकरण आमच्यासाठी काही नवीन नाही. किंवा आम्हाला मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, हे ही आमच्यासाठी नवीन नाही. पण या सरकारची, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची वृत्ती मी तुमच्या समोर आणतोय. या राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकार पुरस्कृत झुंडशाही, गुंडगिरी आणि सुपारी उद्योग सुरू आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.