‘संकटकाळात सोडून गेलेले लोक…’, शरद पवार-अजित पवार भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे, राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळही उपस्थित होते. या भेटीगाठींवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, अजित पवार, प्रफुल्ल पटेल किंवा अन्य लोक हे शरद पवार यांना त्यांच्या संकटकाळात सोडून गेले. पण शेवटीत असा एक प्रसंग असतोच. शरद पवार हे महान व्यक्तीमत्व आहे. महाराष्ट्राचा आधारवड आहे. त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय, त्यांचे नाव घेतल्याशिवाय निष्ठावंत असतील किंवा अन्य असतील त्यांना एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही.

शरद पवार हे स्वतंत्र राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे. शरद पवार यांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेले आहे. आता जे लोक त्यांना सोडून गेले, त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका-टिप्पणई केली ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर ते शुभेच्छा स्वीकारतील, असेही राऊत यावेळी म्हणाले.

6 जनपथवरील बंगल्यावर भेट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. पक्ष आणि चिन्हही अजित पवार यांना मिळाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी 8 खासदार निवडून आणत आपली ताकद दाखवली, तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे 41 आमदार निवडून आले. अजित पवार यांनी वेगळी वाट निवडत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते यंदा शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शरद पवार यांची त्यांच्या 6 जनपथवरील बंगल्यावर भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडीओही समोर आला आहे.