
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. अमेरिकेने हिंदुस्थानवर लावलेल्या 26 टक्के टॅरिफच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारने नेमकं त्याच दिवशी हे विधेयक आणलं, असा घणाघात संजय राऊत यांनी राज्यसभेत केला. मुस्लिमांची एवढी चिंता जिनांनीही केली नव्हती. बॅरिस्टर जिनांचा आत्मा कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसला की काय? असं वाटायला लागलं आहे, अशी चपराक संजय राऊत यांनी लगावली.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालपासून गरीब मुस्लिमांबद्दल खूप चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अचानक, एवढी चिंता होतेय की मुस्लिमही घाबरलेत आणि हिंदूही. का मुस्लिमांबद्दल एवढी चिंता व्यक्त होतेय? रिजिजू यांचं भाषण ऐकलं. मग गृहमंत्र्यांचं भाषण ऐकलं. मुस्लिमांची एवढी चिंता बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांनीही केली नव्हती, जी तुम्ही कालपासून करताय. बॅरिस्टर जिनांचा आत्मा कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसला की काय? असं वाटायला लागलंय. आम्हाला वाटलं होतं की, आपण सर्व मिळून एक हिंदू राष्ट्र बनवत आहोत. पण आपल्या सर्वांचं भाषण पाहून असं वाटतंय की, तुम्ही हिंदू पाकिस्तान बनवायला निघाले आहात, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.
ज्या प्रकारे तुम्ही हे विधेयक घेऊन आलात ते लोकांचं लक्ष भरकटवण्याची रणनीती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच हिंदुस्थानवर 26 टक्के टॅरिफ लावत आक्रमण केलं. सर्वांना बुडवलं. हा खरा मुद्दा असताना त्याच दिवशी सरकार हे विधेयक लक्ष वळवण्यासाठी घेऊन आलं. ट्रम्प यांनी जो टॅरिफ लावला आहे त्याचा आपल्या देशावर काय परिणाम होईल? यावर चर्चा व्हायला हवी होती. आपली अर्थव्यवस्था कोसळेल, आपला रुपया घसरून मरेल, अशा या अनेक मुद्द्यांवरून लक्ष देण्याची गरज असल्याचा विचार जनता करत होती, त्यावरून सरकारने लक्ष हटवलं आहे. आणि हिंदू-मुसलमानच्या मुद्द्यावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
जेव्हाही बेरोजगारी, महागाई, आर्थिक मुद्दे येतात तेव्हा तुम्ही असे धार्मिक मुद्दे आणता. आणि दोन-चार दिवस चर्चा घडवून आणता. कोट्यवधी गरीब मुस्लिमांबद्दल तुम्ही बोलताय. तुम्हाला मुस्लिमांची चिंता कधीपासून व्हायला लागली? तुम्हीच आहात, जे मुस्लिमांना चोर म्हणतात, मुसलमान तुमची जमीन बळकावतील, तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावतील, तुमचे गाय, बैल उचलून नेतील, महाराष्ट्रात मुस्लिमांच्या दुकानावरून मटण घेऊ नका, मुसलमान देशद्रोही आहेत, दहशतवादी आहेत, बटेंगे तो कटेंगे असं म्हणणारेही तुम्हीच आहात. आता तुम्ही मुस्लिमांच्या संपत्तीची चिंता करताहेत. तुम्ही मुस्लिमांच्या संपत्तीचे रक्षक बनले आहात. तुम्ही मला शिवकवू नका, मी चांगला अभ्यास करून इथपर्यंत आलो आहे. हिंदुत्वही वाचलंय आहे आणि सर्वकाही वाचलं आहे. तुम्ही आता आता हिंदुत्वाचे नवे मुल्ला बनलात. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. आमचा जन्म हिंदुत्वाच्या कामासाठी झाला आहे, असे संजय राऊत यांनी सुनावले.
गृहमंत्र्यांचं भाषण काल ऐकलं. गृहमंत्री म्हणाले की, “आम्ही 2025 च्या आधीच्या मशिद, मदरसे आणि दर्ग्यांना हात लावणार नाही. पण ज्या मोकळ्या जमिनी आहेत त्या विकून गरीब मुस्लिम महिलांचं कल्याण करणार, त्यांना पैसा वितरीत करणार”. शेवटी मोकळ्या जमिनी विक्री-खरेदीच्या मुद्द्यावर तुम्ही आलात. ज्याची भीती होती, जमीन विकणार, खरेदी करणार, हा तुमचा जो मूळ उद्देश आहे व्यापार, त्यावर तुम्ही आलात. जमीन विकल्याशिवाय तुम्ही गप्प बसणार नाही. धारावीचं तेच झालं. अयोध्येत 13000 एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे. केदारनाथमध्ये तीनशे किलो सोनं गायब झालं आहे. तुम्ही आपल्या हिंदू धर्माच्या जमिनीचं रक्षण करू शकत नाही आणि आता मुस्लिमांच्या जमिनीचं रक्षण करण्यावर बोलताहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं.
वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटी रुपयांच्या जमिनीच्या सौद्यासाठी हे विधेयक आणलं, संजय राऊत यांचा घणाघात
अयोध्येत संरक्षण विभागाची जमीन तुम्ही विकली. कोणाला विकली? तुमची नजर प्राइम लोकेशनवर असलेल्या 2 लाख कोटीच्या जमीनवर आहे. ती जमीन कोणाला देणार आहात, खरेदी करणारा एकच आहे. विकणारे दोघे आहेत आणि खरेदी करणारा एकच आहे. तुम्हाला जर जमिनीची एवढी चिंता आहे तर, काश्मीरमधील आपले जे पंडित आहेत, त्या 40 हजार काश्मिरी पंडितांची जमीन अजून मिळालेली नाही. त्यांना घर मिळालेलं नाही. तुम्ही त्यांची चिंता करा. त्या काश्मिरी पंडितांची घरवापसी झालेली नाही. लडाखमध्ये चीनने घुसखोरी करून आपल्या 40 हजार वर्गकिलोमीटर जमिनीवर कब्जा केलेला आहे. चीनने कब्जा केलेल्या आपल्या जमिनीची तुम्ही चिंता करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी फटकारले.
हे जे विधेयक तुम्ही आणलेलं आहे त्याचा उद्देश शुद्ध नाही. तुम्हाला त्या जमिनींचा व्यवहार करायचा आहे. आता तुम्ही मोठ-मोठ्या, गोड-गोड गप्पा मारत आहात, पण तुम्ही एक व्यापारी आहात. व्यापारी असेच करतात, गोड-गोड बोलतात आणि सगळं विकून पळून जातात. निरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी हे तुमचेच लोक आहेत. तुम्ही हे जे विधेयक आणलं आहे हे विधेयक आपल्या समाजाच्या आणि देशाच्या हिताचं नाही. तुम्ही पुन्हा एकदा देशात तणाव निर्माण करत आहात. पुन्हा देशात दंगे भडकवण्याचा प्रयत्न करत आहात. पण तुम्ही हे धंदे बंद करा, असा निशाणा संजय राऊत यांनी सरकारवर साधला.