राष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत, सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देणार; संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका

संकटाच्या काळात देश एकत्र आहे, हे दाखवणे गरजेचे असते. त्यामुळे सरकार जी भूमिका घेईल किंवा जो निर्णय घेईल, त्याच्या पाठिशी आम्ही विरोधी पक्ष ठामपणे उभे आहोत. याबाबत कोणतेही मतभेद किंवा वेगळी भूमिका घेण्याचे कारण नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एक देश म्हणून आता सरकारसोबत राहण्याची गरज आहे. कश्मीर प्रश्न, देशाची सुरक्षा याबाबत आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मात्र, आता प्रश्न, शंका उपस्थित करण्याची वेळ नसून देश एक आहे, हे दाखवण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

संकटाच्या काळात देश एकत्र आहे, हे दाखवणे गरजेचे असते. त्यामुळे सरकार जी भूमिका घेईल किंवा जो निर्णय घेईल, त्याच्या पाठिशी आम्ही विरोधी पक्ष ठामपणे उभे आहोत. याबाबत कोणतेही मतभेद किंवा वेगळी भूमिका घेण्याचे कारण नाही. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, अशीच भूमिका या बैठकीत घेतली जाते.मात्र, विरोधी पक्षांकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन होणार असेल तर या बैठकांना अर्थ आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांनीही कधीकाळी हा देश चालवला आहे. पाकिस्तानसारख्या शत्रूशी मुकाबला केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या सूचनाही महत्त्वाच्या आहेत. चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. मात्र, संसदेत याबाबत चर्चेची मागणी केल्यास ती नाकरण्यात येते. कश्मीर प्रश्नावर सविस्तर चर्चा ही संसदेत होण्याची गरज आहे. कश्मीर प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवशेन घेण्याची गरज आहे. या अधिवेशात विरोधी पक्षांच्या, देशातील जनतेच्या भावनांचा विचार होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. विविध मुद्द्यांवर संसदेत चर्चा होते. मात्र, कश्मीर आणि मणिपूरवर चर्चा होत नाही. हे देशातील धगधगते प्रश्न आहेत. त्यावर चर्चा झालीच पाहिजे.

दहशतवाद आणि कश्मीर हे गंभीर प्रश्न आहेत. या संकटाच्या काळातही काही लोकांकडून हिंदू-मुस्लिम आणि जाती-धर्माचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो यशस्वी झाला नाही, यासाठी जनतेचे आभार मानले पाहिजे. या गंभीर विषयावर संसदेत चर्चा झाली तर सरकारला नक्कीच एक दिशा मिळेल, अशी आमची भूमिका आहे. या संकटाच्या काळात राष्ट्र म्हणून सरकार जो निर्णय घेईल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, याबाबत मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशा प्रसंगात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रकर्षाने आठवण होते. इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये पाकिस्तानशी मुकाबला करत त्या देशाचे दोन तुकडे केले. त्यांनी चांगल्याप्रकारे तो प्रसंग हाताळत पाकिस्तानला चांगली अद्दल घडवली होती. आताच्या प्रसंगात सरकार दुबळे असले तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना बळ देऊ. सरकार जो निर्णय घेईल, त्यासोबत आम्ही आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.