
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारच्या गोंधळ कारभारावर मोठं भाष्य केलं आहे. अमित शहांनी एकनाथ शिंदेंना काय उत्तर दिलं, ते मला माहिती आहे. ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, त्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर आली आहे. उद्या ती शून्यावरती येईल. राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आव आणावा. पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. कारण गेल्या साडेतीन वर्षांमध्ये राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली आहे. आर्थिक अराजकाच्या खाईत राज्य सापडलेलं आहे. मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेनं ग्रासलेलं आहे. अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली की, अजित पवार आमच्या फायली मंजूर करत नाही. आणि आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्नच आहे. तुमचे जे 5-25 गद्दार आमदार आहेत. ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्यासोबत बरोबर राहिलेत. त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी तुम्हाला हवी आहे का? अमित शहांनी यावर एकनाथ शिंदे यांना काय उत्तर दिलं, ते मला माहिती आहे. ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होईल, असे संजय राऊत म्हणाले.
“महात्मा फुलेंविषयी चंद्रशेखर बावनकुळे यांना डोक्यात एवढी तिडीक का असावी?”
महात्मा फुलेंविषयी चंद्रशेखर बावनकुळे यांना डोक्यात एवढी तिडीक का असावी? महात्मा फुले यांचा विचार सामनामध्ये मांडलेला आहे. महात्मा फुले यांच्यावरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाने कारण नसताना अडवून ठेवलेला आहे. महाराष्ट्रात फुलेंचा विचार अडवून ठेवला जात असेल तर, नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणतो. काही अतरंग लोकं त्या समाजातले रस्त्यावरती येऊन आता सुद्धा फुलेंच्या विचारावर चिखलफेक करत असतील तर, तुम्हाला फुलेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. कुठल्यातरी एका ब्राह्मण संघटनेनं विरोध करून काही गुंड निर्माण केलेले आहेत. फडणवीसांना ब्राह्मण असण्याचा गर्व आहे, असं ते नेहमी सांगतात. आणि ब्राह्मण सभा त्यांच्या ऐकण्यातल्या आहेत. सगळ्या ब्राह्मणांविषयी मी बोलत नाही. काही संघटना आहे. फडणवीसांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे, इतर समाजाला देतात ना. फुलेंचे विचार का अडवताय? तुमचं काय म्हणणं असेल तर वेगळा सिनेमा काढा. आम्ही त्याला विरोध करणार नाही. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत, मनात रुजलेले आहेत. देशात म्हणून आपल्याला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा आहे. ही मोदींच्या विचारामुळे आणि संघाच्या विचारामुळे नाही. फुले, शाहू, आंबेडकरांमुळे हा महाराष्ट्र मोठा झालेला आहे. फडणवीसांनाच प्रश्न विचारणार आहोत. म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्रात तो फुले विरुद्ध फडणवीस , असा आहे.
“कुडाळमध्ये घडलेली घटना ही बीडच्या संतोष देशमुख हत्येपेक्षाही भयंकर”
सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये घडलेली घटना ही बीडच्या संतोष देशमुख हत्येपेक्षाही भयंकर आहे. आम्ही त्यावर उद्या उद्धवसाहेबांशी चर्चा करणार आहोत. आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल. त्याच पद्धतीने एक निर्घृण खून झालेला आहे. त्याची माहिती येतेय. वैभव नाईक हे तिथे 10 वर्षे आमदार होते. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद, खुना-खुनी आहे, त्या खुना-खुनीशी वैभव नाईक सातत्याने संघर्ष आणि लढा देत आहेत. आतापर्यंत त्या जिल्ह्यात 27 खून झालेले आहेत. त्यामध्ये 9 खून हे आमच्या शिवसैनिकांचे आहेत. अत्यंत निर्घृणपणे मारलेलं आहे. आणि आजही अशा प्रकारचे हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे. यांचा आका कोण आहे? या विषयी वैभव नाईक यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.