अजित पवार, एकनाथ शिंदेंचं बौद्धिक संघ मुख्यालयात घेतलं जाणार, भविष्यात यांचे पक्ष राहतील की नाही ही शंका; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपसह अजित पवार आणि शिंदे गटावर निशाणा साधला. अजित पवार, एकनाथ शिंदेंचं बौद्धिक संघ मुख्यालयात घेतलं जाणार आहे. भविष्यात यांचे पक्ष राहतील की नाही ही शंका आहे, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मंत्रिपदावरून महायुतीत सुरू असलेल्या नाराजी नाट्याचा संजय राऊत यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला.

भाजपचं केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राजकारण सुरू आहे. विरोधकांचे पक्ष फोडताहेत, घरं फोडताहेत. आणि महाराष्ट्र त्यापासून अपवाद नाही. आम्ही सगळे त्यातून गेलेलो आहोत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना आतापासूनच त्यांच्या पक्षाला जी वागणूक मिळतेय ती पाहता भविष्यात यांचे पक्ष राहतील की नाही ही शंका सगळ्यांना आहे. आजच मी पाहिलं की त्यांना रेशीम बागेत बोलावलं आहे. कुठल्या तरी प्रवचनाला की बौद्धिकाला, असं मी ऐकलं. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं बौद्धिक संघ मुख्यालयात रेशीम बागेत घेतलं जाणार आहे. आता या पेक्षा अजून अधःपतन या दोन पक्षांचं काय राहिलं आहे? माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या विचारधारेविरुद्ध लढत राहिले आणि आम्ही सगळे. मुळात त्याचं बैद्धिक सध्या दिल्लीत घेतलंच जातंय. आता नागपुरात सुद्धा ते बौद्धिकाला उपस्थित राहत असतील तर आनंद आहे. त्यांनी शेवटी स्वतःचा पक्ष हा फक्त विलीन करण्याचाच बाकी आहे, असा घाणाघात संजय राऊत यांनी केला.

“शिंदे गटात ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत त्यांच्याकडे निष्ठा वैगरे दिसत नाही”

मंत्रिपदावरून रडारड सुरूच आहे, प्रत्येक पक्षात, भाजपमध्येही आहे. कुठे रडारड आहे, कुठे आदळआपट आहे, पण आहे. छगन भुजबळ यांच्यासारखा नेता ज्याने अजित पवार गट स्थापन करण्यामध्ये एक भूमिका बजावली. महाराष्ट्रातल्या एका समाजिक प्रश्नावर आपली भूमिका घेतली. आज ते काय रडताहेत, ते काय बोलताहेत. कोण दादा कसला वादा, म्हणजे या टोकापर्यंत भांडणं पक्षापक्षात सुरू आहेत. शिंदे गटात ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत त्यांच्याकडे निष्ठा वैगरे दिसत नाही. रडताहेत, पुन्हा नागपुरात किंवा मुंबईत येणार नाही. काही लोक बॅगा भरून निघून गेले. मुळ शिवसेना पक्षात हे असं कधी चाललं नाही आणि कोणी घडवण्याचा प्रयत्न केला नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी फटकारले.

“शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले, खळबळ माजण्याचं कारण नाही”

महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहेत. माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत, विधिमंडळाचे सदस्य आहेत. ते नागपूरला गेलेत. नवीन सरकार स्थापन झालेलं आहे. प्रचाराच्या तोफा या थंड झाल्या आहेत. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालेलं आहे. त्यांनी उत्तम प्रकारे राज्याच्या हिताचं काम करावं. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कल्याणासाठी काम करावं, अशा शुभेच्छा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री गेले असतील. त्यात फार मोठी खळबळ माजण्याचं कारण नाही. किंबहुना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी राज्याच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. त्यात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरेसाहेब, ही महाराष्ट्राची पद्धत आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

तुम्ही असं कोणतं हिंदुत्व धरून ठेवलं आहे. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं कधीही आपल्या मूळ विचारापासून अजिबात फारकत घेतलेली नाही. जे असे विचार मांडतात त्यांची आम्हाला किव येते. बांगलादेशात हिंदुत्वावर होणारे हल्ले, सावरकारांचा विषय, दादरच्या हनुमान मंदिराचा विषय असेल, कोण आलं पुढे? बचाव करण्यासाठी आणि भूमिका मांडण्यासाठी, आम्हीच आलो ना. दादर रेल्वे स्थानकावरील 80 वर्षांपूर्वीच्या मंदिरावर जेव्हा भाजप सरकारचे बुलडोजर आले तर त्यापुढे आम्ही उभे राहिलो, मंदिर वाचवण्यासाठी पाहा तुम्ही, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी विरोधकांना दिले.

“भुजबळ हे त्यांची लढाई लढायला समर्थ”

छगन भुजबळ हे त्यांची लढाई लढतील आणि लढायला समर्थ आहेत. लढणारे नेते आहेत ते. सातत्याने त्यांनी शिवसेनेत असतानाही त्यांनी संघर्ष केला. बेळगावच्या प्रश्नावर महापौर असताना बेळगावात जाऊन आंदोलन करणारे तेव्हा ते महत्त्वाचे नेते होते. तेव्हा महापौर असताना भुजबळ दोन महिन्यापेक्षा तुरुंगात राहिले. त्या कर्नाटकच्या पोलिसांनी प्रचंड मारहाण केली, डोकं फोडलं त्यांचं हे आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे ते मैदानातून कधी पळत नाहीत, हे मी खात्रीने सांगतो, असे संजय राऊत भुजबळांबद्दल म्हणाले.

“अजित पवार यांचा पक्ष नसून गट”

अजित पवार यांचा पक्ष नसून गट आहे. निवडणूक आयोगाने किंवा अमित शहांनी त्यांनी जरी तो पक्ष सुपूर्द केला असला तरी त्याला कोणतीही विचारधारा नाही. तो पक्ष नाही तो गट आहे. पक्ष शरद पवारसाहेबांचा एक विचारधारा घेऊन उभा आहे. पक्ष उद्धव ठाकरेसाहेबांचा शिवसेना, जो एक विचारधारा घेऊन उभा आहे. जो कधी रेशीम बागेत जाणार नाही, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी अजित पवार गटाला लगावला.