‘राजकीय मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते. पण महाराष्ट्रातील वातावरण टीकेपुरते मर्यादित राहिलेले नसून जहरी टीका व्हायला लागली आहे. तरीही आपण सगळे या राज्याचे काही देणे लागतो. राज्यात एखादे सरकार आपल्या विचारांचे नसेल, तरी त्यांनी एखादे चांगले पाऊल उचलले असेल आणि ते राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या हिताचे, सामाजिक समीकरणाला दिशा देणारे असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेऊन त्याचे कौतुक केले पाहिजे ही शिवसेनेची भूमिका हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे’, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. दैनिक सामनातील ‘देवाभाऊ, अभिनंदन!’ या अग्रलेखावर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नक्षलवादामुळे हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला. गडचिरोली-चंद्रपूर ही खरे म्हणजे सुवर्णभूमी आहे. गडचिरोली पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जमशेदपूरनंतर गडचिरोलीला पोलाद सिटी बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचे आहे.’
देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी शस्त्र ठेवले आणि संविधान हाती घेतले. याचे प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला कौतुक वाटले पाहिजे. नरेंद्र मोदींनी चांगली कामे केली तेव्हाही आम्ही त्यांचे कौतुक केलेले, टीकाही केलेली. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचे कौतुक कुणी करणार नसेल तर ते चुकीचे ठरेल, असेही राऊत म्हणाले. याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडले पालकमंत्रीपद खंडण्या गोळा करण्यासाठी मागितले होते. पोलाद आणि खाण उद्योगाकडून खंडणी गोळा करण्यासाठी पाच पांडव नेमले होते, ते कौरवाचे काम करत होते, हे महाराष्ट्राने पाहिले, असेही राऊत मिंधेंचा नामोल्लेख न करता म्हणाले.
Mumbai, Maharashtra: On Saamna editorial praising Maharashtra CM Devendra Fadanvis for the surrender of Naxals in Gadchiroli, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, “I have seen the visuals of 10 Naxalites, surrendering their arms and accepting Indian constitution, so if… pic.twitter.com/3upYX48T2N
— ANI (@ANI) January 3, 2025
नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे. कश्मीरमध्ये तरुणांच्या हातात शस्त्र आणि दगड आले त्याचे कारण त्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे ते दहशतवादाकडे वळले. गडचिरोली, तेलंगणातील अनेक भागात, आंध्रच्या सीमेवरचे जिल्हे, छत्तीसगड, झारखंड येथील आदिवासींना हाताला काम नसल्याने नक्षलवाद पत्करावा लागला. सुशिक्षित तरुण हा पकोडो तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला नक्षलवाद म्हणतात. तो जर असा नष्ट होणार असेल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचलेल असेल तर ते अत्यंत विधायक आहे. त्याचे अभिनंदन आणि कौतुक करणे सगळ्यांचे कर्तव्य आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सतत संवाद सुरू असतो. संवादाची अनेक साधने असतात. त्या साधनांचा वापर होत असतो. जसा आज सामनातून संवाद साधला गेला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले असेल, तरी दुसऱ्या बाजुला बीडसारख्या घटना घडत आहेत. तिकडे बंदुकीचे राज्य आहे. ते देखील ते मोडून काढतील. पण त्यांनी गडचिरोलीतून सुरुवात केली आणि नंतर बीडमध्ये येणार असेल तर कौतुक जरुर करू, असेही राऊत म्हणाले.