बीडच्या आकाचा CM, DCM सोबत वावर, त्यामुळे खरोखर न्याय मिळेल का अशी लोकांना शंका! – संजय राऊत

Pc - Abhilash Pawar

बीडचा विषय हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था संदर्भातील महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये कायद्याचे राज्य नव्हते. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन आणि तोच न्याय. बीड जिल्ह्याने अनेक खून पाहिले आणि पचवले, पण संतोष देशमुख यांच्या खुनानंतर आधीच्या खुनांनाही वाचा फुटली आणि महाराष्ट्र अस्वस्थ झाला. सरकारलाही अखेर हालचाल करावी लागली. सरकारलाही असे खून पचवायची सवय आहे. बीडच्या आकाचाही सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या वावर, संवाद असल्याचे चित्र, व्हिडीओ समोर आले. त्यामुळे बीडच्या घटनेत खरोखर न्याय मिळेल का? खरा तपास होईल का? अशी शंका लोकांना आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

कुणालाही सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण आतापर्यंत फडणवीस यांनी किती जणांना सोडलेय, किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून सरकारमध्ये घेतले, किती जणांचा आक्रोश आणि किकाळ्या दाबल्या, किती जणांना अडकवले या संदर्भात त्यांनी स्वत:च एक एसआयटी स्थापन करून रिपोर्ट घ्यायला हवा, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

बीडच्या प्रकरणात फडणवीस फार गंभीर असल्याचे कुणीतरी सांगितले. कारण महाराष्ट्र राज्याची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी. वाल्मीक कराडला अटक केली, पण हा खटला बीडमध्ये चालवू नये. शहाबुद्दीने खटला आणि इतर खटले जसे राज्याबाहेर चालवले जातात, तसा हा खटलाही बीड जिल्ह्याबाहेर चालला पाहिजे. पण सरकार, गृहमंत्री त्यांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही, असे राऊत म्हणाले.

बीडचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे सध्या आपण मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. पण आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहिती होता, आता बीड क्लिंटन आलेला आहे. फडणवीस यांना हे सगळे माहिती असून त्यांनी राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने काम करतोय, हे दाखवून देण्यासाठी सत्य आणि न्यायाची बाजू घेतली पाहिजे. आरोपी कितीही मोठा असो, त्यांचा मित्र असो, त्यांच्या मंत्रिमंडळात असो तरीही त्याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

वाल्मीक कराड असलेल्या पोलीस स्थानकात आणले 5 पलंग; ‘लाडके आरोपी’ योजना म्हणत वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

ते पुढे म्हणाले की, बीडच्या संदर्भात एक अटक झाली असून परभणी संदर्भात अटका व्हायच्या आहेत. उद्धव ठाकरे या दोन्ही घटनांविषयी अत्यंत गांभीर्याने चर्चा करत असून दोन्ही जिल्ह्यात संपर्क ठेऊन आहेत. अनेकांनी तिथे राजकीय यात्रा केल्या हे खरे, पण शिवसेना त्यापैकी नाही. बीड आणि परभणीत दोन निरपराध जीव मुकलेले आहेत. तपासाला आता सुरुवात झालेली आहे. तपासाला दिशा आणि गती मिळू द्या. त्यानंतर आम्ही सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयाच्या सांत्वनाला जाऊ. आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही.