…तर इतिहास धस यांना क्षमा करणार नाही, संजय राऊत कडाडले

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने खळबळ उडाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने धस-मुंडे भेट झाली. या भेटीला बावनकुळेंसह धस यांनीही दुजोरा दिला. यावरून धस यांच्यावर टीका होत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर कठोर शब्दात भाष्य केले आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रुंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. धस यांनी हे कृत्य केले असेल तर त्यांना इतिहास क्षमा करणार नाही, असा घणाघात राऊत यांनी केला. ते शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

धस-मुंडे भेटीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, बीडमधल्या एका प्रमुख नेत्याने मला सांगितले होते की सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेऊ नका. सुरेश धस देशमुख कुटुंबाला न्याय देतील, ते या लढ्याचे नेतृत्व करत आहेत असे आम्ही म्हणत होतो तेव्हा लोकांनी समजावले होते की त्यांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील. धस, मुंडे आणि कराड एकच आहे. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. दुर्दैवाने हे सत्य होताना दिसत आहे.

मला वाईट वाटते की, एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रुंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. हा माणूस आम्हाला न्याय देईल, असे म्हणत संतोष देशमुख यांची लहान मुलं धस यांच्या मागे न्यायासाठी धावत होती. जर धस यांनी हे कृत्य केले असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही, इतिहास क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा केला असेल आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर बीडचीच नाही तर राज्याची जनताही हे लक्षात ठेवेल. तुम्ही जे कृत्य केले ते पाप असून या पापाला क्षमा नाही. हे विश्वासघाताच्याही पुढचे पाऊल आहे, असे राऊत म्हणाले.

धस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेऊ नका असे मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते. त्यांचे म्हणणे असे होते की वाल्मीक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहेत. एका नाण्याला दोन बाजू असतात, पण या तीन बाजू आहेत. पण मी विश्वास ठेवला नाही, असेही राऊत म्हणाले.

शिंदेंचा पक्ष शहांच्या मालकीचा

एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहा यांच्या मालकीचा आहे. शहांना जे हवे तेच शिंदे बोलतात. अमित शहा यांनी शिवसेनेतील एक गट फोडला आणि शिंदेंच्या ताब्यात दिला. शहांनी सध्या तो शिंदेंना चालवायला दिला आहे, असे हल्लाबोलही राऊत यांनी केला.

सरकारकडून लपवाछपवी

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हापासून 2000 लोक गायब आहेत. हे लोक मारले गेले असावेत अशी शंका आम्हाला आहे. संसदेत हा सवाल केला असता माझा माईक बंद केला. याचाच अर्थ काहीतरी घडले असून सरकार लपवत आहे, असेही राऊत म्हणाले.

मतदारांनाही भिकारी समजून पैसे दिले

हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाहीत, आम्ही पीक विमा देतोय, असे संतापजनक विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. याचाही राऊत यांनी समाचार घेतला. सरकारने मतदारांनाही भिकारी समजून पैसे दिले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत या सगळ्या लोकांनी मतदारांना भिकारी बनवले. घराघरात पैसे पाठवले आणि मतं विकत घेतली, अशी टीका राऊत यांनी केली.

तुमच्या बापाचा पैसा आहे का?

निधी पाहिजे तर भाजपात या, अशी उघड धमकी देणाऱ्या मंत्री नितेश राणे यांचाही राऊत यांनी समाचार घेतला. मोदी अमेरिकेत जाऊन म्हणता की सगळी लोक आमची आहेत. वसुधैव कुटुंबकम् असा नारा मोदी देतात. पण भाजप सरकारचे मंत्रीच म्हणतात की, महाविकास आघाडीचा सरपंच असलेल्या गावात एकही रुपयाचा निधी दिला जाणार नाही. निधी पाहिजे असेल तर भाजपात या. हा तुमच्या बापाचा पैसा आहे का? असा सवाल तर राऊत म्हणाले की, हा जनतेचा पैसा असून देशात लोकशाही आहे. मंत्रीपदाची शपथ घेतात तेव्हा म्हणतात की, मी कुणाशीही द्वेष भावना मनात ठेऊन काम करणार नाही. सगळ्यांना समान न्याय देईल. पण मंत्र्यांकडून ही कोणती भाषा सुरू आहे. हे संविधानाला मानत नाहीत. त्यामुळेच आम्ही संविधान धोक्यात असल्याचे म्हणतो. पण आज वेळ तुमची आहे, उद्या आमचीही येईल, असे राऊत म्हणाले.

अमेरिकेतून आणखी 119 हिंदुस्थानी हद्दपार! आज स्थलांतरितांचे दुसरे विमान अमृतसरमध्ये उतरणार

मोदी निघाले, ट्रम्प विसरले

मोदींनी ट्रम्प यांची गळाभेट घेतली. पण देशासाठी हा घाट्याचा सौदा ठरला. आयात कर वाढला असून हिंदुस्थानींना घेऊन आणखी एक विमान येत आहे. हे मोदी रोखू शकले का? मोदी निघाले, ट्रम्प विसरले आणि हिंदुस्थानींना बेड्या घालून, साखळदंडाने बांधून आणखी एक मार्गस्थ झाले, असा टोलाही राऊत यांनी लगावला.