जो बुंदसे गयी, वो हौदसे नही आती; धस यांचा बुरखा फाटलाय, संजय राऊत यांची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चा दाखला देत मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा सूचक इशारा केला होता. यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनीही पहिल्यांदाच माध्यमांसमोर मुंडे यांचा राजीनामा मागितला. मात्र धस यांच्या आधीही अनेकांनी ही भावना व्यक्त केली होती, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. सुरेश धस यांच्यावर कुणी विश्वास ठेवेल असे वाटत नाही. त्यांचा बुरखा फाटलेला आहे, अशी टीकाही राऊत यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केली.

अधिवेशन सुरू होईल तेव्हा धनंजय मुंडे यांच्या प्रश्नावरून सभागृह चालेल की नाही अशी शंका वाटते. कालही एका मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा झाली. अजित पवार गटाचे दोन्ही मंत्री रडारवर आहेत. मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणतीही खळखळ न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

अंजली दमानिया, सुरेश धस भ्रष्टाचारावर बोलत आहेत. माणिक कोकाटे यांना तर न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे आणि तु्म्ही विधानसभा अध्यक्षांवर सर्व सोडताय. विधानसभा अध्यक्ष नि:पक्ष आहेत का? असा सवाल करत राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या 40 आमदारांच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांची चाल, चलन, चारित्र्य आम्ही पाहिले आहे. ते कायद्याने अजिबात निर्णय घेणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सुरेश धस यांच्यावर कुणी विश्वास ठेवेल असे वाटत नाही. त्यांचा बुरखा फाटलेला आहे. तरीही आम्ही म्हणतोय की, मैदानामध्ये लढायचे नाटक करत असतील तर त्यांनी ते करत रहावे. जो बुंदसे गयी, वो हौदसे नही आती असे जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत आहे. त्यांनी ज्या पद्धतीने मुंडेंची भेट घेतली. त्यांना अंधारात ठेऊन ती भेट झाली असेल. पण ज्या क्षणी मुंडे बैठकीला आले त्या क्षणी त्यांनी बाहेर पडायला पाहिजे होते. त्यांनी माध्यमांसमोर सांगायला हवे होते की, मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला, पण मी खंबीरपणे लढतो.

मोदींनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाणे का टाळले?

दिल्लीत होत असलेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मंडपात होण्याऐवजी दुसरीकडे होत आहे. हे बरोबर नाही. संमेलनाच्या आयोजकांनी याला मान्यता का दिली? पंडीत जवाहरलाल नेहरू हे उद्घाटनासाठी संमेलनाच्या मंडपात आले होते. ज्या तालकटोरा मैदानावरती हे संमेलन आहे तिथल्या अनेक राजकीय कार्यक्रमांना नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून गेले आहेत, मग त्यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाणे का टाळले? आमचे साहित्यिक, कवी, ग्रंथविक्रेते यांच्यापासून पंतप्रधानांना धोका आहे का? सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनात उद्घाटन सोहळा ठेवला ही पंतप्रधान कार्यालयाची सूचना असावी, असे राऊत म्हणाले.

विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश

आम्ही आमची भूमिका परखडपणे मांडली

शरद पवार हे देशाचे नेते आहेत. जसे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सगळ्याच पक्षातील कार्यकर्ते, नेते सन्मान करत होते आणि तसेच शरद पवार यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्याशी कोणताही वाद नव्हता आणि मतभेद असण्याचाही प्रश्न नाही. ज्या चुकीच्या पद्धतीने महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला, त्याच्यामुळे महादजी शिंदे यांची प्रतिष्ठा कमी झाली ही आमची भूमिका होती. साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नये. महादजी शिंदे हे खूप मोठे व्यक्तिमत्व होते, त्यांनी तलवारीच्या जोरावर दिल्लीवर राज्य केले. त्यामुळे दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना महादजी शिंदे यांचा पुरस्कार द्यावा याला आमचा विरोध होता आणि आम्ही आमची भूमिका परखडपणे मांडली, असे राऊत यावेळी म्हणाले.