राज्यातील गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार झाल्यानंतर मिंधे गटाची झोप उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीआधी मिंधे गटाने गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनवणी केली. या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी पार होणार आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली.
शुक्रवारी सकाळी मिंधे गटाच्या उच्च न्यायालयातील चुळबुळीबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत म्हणाले की, मिंधे गट निवडणुकीत हरणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना अपात्र ठरवले आहे. आता दोन महिन्यांसाठी धावाधाव करून काय मिळणार आहे? सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा आणि घटनेचा मान राखला असता तर 24 तासात हे सगळे अपात्र ठरतील. त्यांचा पक्ष आणि चिन्हही गोठवले जाईल, असेही राऊत म्हणाले.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मिंधे सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनांची घोषणा केली. तिजोरीत पैसे नसतानाही या योजना राबवण्याचा हेका सरकारने सोडलेला नाही. यावर वित्त विभागाने चिंता व्यक्त करत आक्षेपही नोंदवला. यावरही राऊत यांनी परखड शब्दात भाष्य करत मिंधे सरकारची सालटी काढली. देश आणि राज्य चालवताना आर्थिक शिस्त असायला हवी. पण तिजोरीत पैसा नसतानाही सरकार निवडणुका जिंकण्यासाठी मोठ्या घोषणा करत आहे. यासाठी पैसा कुठून आणणार याचीही तजवीज नाही. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे, असे म्हणत खासदार राऊत यांनी लाडक्या भावाप्रमाणे घर चालवणाऱ्या लाडक्या बहिणीलाही 10 हजार द्यायला हवीत याचा पुनरुल्लेख केला.
मिंधे हादरले! सुप्रीम कोर्ट अपात्रतेचा फैसला करणार, गद्दार आमदारांची हायकोर्टात चुळबुळ सुरू
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे नुकतेच परदेशातून आले असून राज्यात काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र, मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांनी बिनशर्त पाठींबा दिला होता. विशेष म्हणजे मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही असे तेच म्हणाले होते. पण लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठींबा दिला आणि फक्त एका महिन्यात भूमिका बदलत विधानसभेला स्वबळाचा नारा देत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकून करण्यासाठी ही पावलं उचलली जात आहेत का हे पहावे लागेल. काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत, असेही राऊत म्हणाले.
लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र राहिले असते पक्ष टीकला असता. राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून हे विधान करणाऱ्या राज ठाकरे यांचा राऊतांनी खास शैलीत समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत झाला आहे. कधी नव्हे ते राष्ट्रवादीला इतके मोठे यश मिळाले आणि लोकसभेला 8 जागा जिंकल्या. हे पक्ष टीकल्याचे, कार्यकर्ते जाग्यावर असल्याचे आणि लोकांनी भरभरून मतदान केल्याचे लक्षण आहे. राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही पक्ष आणि चिन्ह पळवण्यात आला. पण आम्ही ताकदीने उभे राहिलो आणि 9 जागा जिंकलो, असेही राऊत म्हणाले.