मालवणातील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर हात जोडून माफी मागितली. शिवरायांच्या चरणांवर डोके ठेवून 100 वेळा माफी मागतो, असे त्यांनी सांगितले. मात्र माफी मागितली तर विषय सूटतो का? असा सवाल करत सरकार यात पूर्णपणे अडकले असून याप्रकरणात त्यांना बाहेर तोंड दाखवायची जागा राहिलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एवढी बेफिकीरी आणि भ्रष्टाचार महाराष्ट्र सहन करणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
खासदार संजय राऊत हे शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी मालवणातील राजकोट किल्ल्यालाही भेट देत शिवपुतळा कोसळला त्या दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राऊत यांनी मिंधे सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टिकास्त्र सोडले.
महाराष्ट्र मिंध्यांची माफी स्वीकारायला तयार नसेल तर त्याला विचारतं कोण. मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कुणाची होती ते मिंध्यांनी जाहीर करावे. यात तुमच्या घरातील कुणी आहे का? काम बेकायदेशीरपणे करण्यामागे कुणाची प्रेरणा होती? ठाणे कनेक्शन काय आहे? इतक्या अनुभवशुन्य कलाकाराला कुणामुळे काम मिळाले? असा सवाल राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, आम्ही तरुण कलाकारांना कायम उत्तेजन देत आलो आहोत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना अनुभव लागतो. कायदेशीर, सांस्कृतिक बाबींची पूर्तता करावी लागते. पण त्या पूर्ण केलेल्या नसून लोकांचा उद्रेक झाल्यानंतर सरकार जागे झाले. आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते येथे आले. त्यांना रोखण्यासाठी त्यांनी पक्षाचे गुंड रस्त्यावर उभे केले. पत्रकारांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली. राज्यात गृहमंत्री आहे का? पोलिसांना घमक्या दिल्या जात आहेत. पोलीस आमदारांच्या गाड्या धूत आहेत. इतका दुबळा गृहमंत्री कधी पाहिला नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.
आपटे अचानक उपटले कसे? शिवपुतळा दुर्घटनेवरून संजय राऊत यांचा संतप्त सवाल, ठाणे कनेक्शनवर ठेवलं बोट
दरम्यान, या सर्व प्रकरणावर मोदींनी मौन बाळगले आहे. याचाही राऊत यांनी समाचार घेतला. पंतप्रधान कायम मौनात असतात. जिथे त्यांना चमकायची संधी मिळते तिकडे ते जरूर जातात. ते येणार म्हणून इथे तीन-तीन हेलिपॅड उभारले आणि त्याचा कोट्यवधींचा खर्च सार्वजनिक बांधकाम खात्याने केला. एरवी शिवजयंतीला दोन-दोन ओळी ट्विट करणाऱ्या पंतप्रधानांच्या हाताने उद्घाटन झालेला पुतळा त्यांची पाठ वळताच कोसळला, यावर मात्र त मौन आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
View this post on Instagram