
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीतील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर दुसऱ्यांच दिवशी त्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यासाठी त्यांनी तब्बल 1 तास वेटिंगवरही रहावे लागले. मात्र त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीवर राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केले.
गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींनी खासदार संजय राऊत यांना भुजबळ-पवार भेटीवर प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, छगन भुजबळ हे मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केलेले आहे. बऱ्याचदा रंग, रुप बदलून नाट्य निर्माण करण्यात ते माहीर आहेत. भुजबळ का गेले? कसे गेले? यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात काय हंगामा झाला हे सर्वांना माहिती आहे. पण शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणात त्यांना प्रतिष्ठा मिळालेली आहे. महाराष्ट्रात एक खुले रंगमंच आहे, ते फिरत राहते आणि छगन भुजबळांसारखे लोकं फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
लाडक्या बहिणीलाही 10 हजार द्या!
यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ योजनेवरही रोखठोक भाष्य केले. महाराष्ट्रावर 8 लाख कोटींचे कर्ज आहे. ही छोटी रक्कम नाही. पण लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारने नवनव्या योजना आणल्या. लाडकी बहीण हो योजना मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेची कॉपी आहे. आता लाडका भाऊ योजनाही आणली आहे. लाडक्या भावाला जो बारावी पास आहे त्याला 6 हजार, तर जो बेरोजगार पदवीधर आहे त्याला 10 हजार देणार. मग लाडक्या बहिणीला 1500 रुपये का? 1500 रुपयात मुख्यमंत्र्यांचे घर चालते का? मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण, लाडकी सून यांचे 1500 रुपयात घर चालेल का? लाडक्या बहिणीवर अन्याय का? आमची मागणी आहे की लाडक्या बहिणीलाही 10000 रुपये द्या आणि महाराष्ट्रात स्त्री-पुरुष समानता असल्याचे दाखवून द्या. तसे झाले तरच महाराष्ट्रात शेतकरी, बेरोजगारांच्या आत्महत्या बंद होतील, अशा शब्दात राऊत यांनी सरकारचे कान टोचले.
View this post on Instagram
280 जागा जिंकणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी आलेल्या सर्व्हेत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असे दिसत आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्हाला 10 जागाही मिळणार नाहीत असे महायुतीचे लोकं म्हणत होते. पण आम्ही 31 जागांवर विजय मिळवला. तर 4 जागांवर खुप कमी फरकाने पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 280 जागा जिंकेल.
महाविकास आघाडीचा ‘असा’ आहे फॉर्म्यूला
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष 288 जागांची चाचपणी, अभ्यास करत आहे. तिघांचाही अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकत्र बसू आणि कुणी, कुठे आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवू. लोकसभेप्रमाणे ज्याची ताकद जिथे जास्त, जो जिंकू शकेल, त्यालाच तो मतदारसंघ मिळेल हे आमचे सूत्र असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.