‘कालपर्यंत मुसलमानांविषयी विखारी भाषणं देणारे आज ‘सौगात-ए-मोदी’ करताहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे की…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

ईदच्या निमित्ताने भाजपचे 32 हजार कार्यकर्ते मुस्लिम कुटुंबियांच्या घरोघरी जाऊन त्यांना ‘सौगात-ए-मोदी’ ही भेट देणार आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ही ‘सौगात-ए-सत्ता’, ‘सौगात ए-पॉलिटिक्स’, ‘सौगात-ए-मुसलमान लांगूलचालन’ आहे, असे राऊत शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मोदी सरकारने 36 लाख मुस्लिमांसाठी ‘आनंदाचा शिधा’ पाठवला आहे. मोदींनी गेल्या 3 वर्षात मुस्लिम बांधवांविरुद्ध आपण स्वत:च केलेली भाषणं ऐकावी आणि आत्मचिंतन करावे. मुसलमान हा देशातील घुसखोर आहे, मुसलमान तुमच्या जमिनी घेतील, तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडतील, दोन गाई, म्हशी असतील तर मुसलमान एक ओढून नेतील असे सांगणाऱ्या मोदी, भाजपला मुसलमान प्रेमाच्या फुटलेल्या उकळ्या ढोंग आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेले हे राजकारण आहे, असे राऊत म्हणाले.

जो माणूस मुसलमानांविषयी विखारी पद्धतीने कालपर्यंत बोलत होता, त्यांना देशाचे नागरिक मानायला तयार नव्हता तो आज मुसलमानांच्या बाजूने बोलत आहे हे ढोंग नाही तर काय. याचा अर्थ स्पष्ट आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये जिथे मुस्लिम बहुसंख्या आहेत, तिथे भाजपला प्रत्येक बुथवर जास्तीत जास्त मतं घ्यायची आहेत, ती सुद्धा घटनाबाह्य पद्धतीने. मग त्यांना दाखवायचे आहे की आम्ही ‘सौगात-ए-मोदी’ केल्याने मुस्लिमांनी आम्हाला मतदान केले. खरे तर लोकसभा, विधानसभेला अनेक भागात मुस्लिमांना मतदान करू दिले नाही. मतदान यादीत त्यांच्या जागी दुसरी नावे टाकून त्यांच्याकडून मतदान करून घेतले. मुस्लिमांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिले नाही. पुढच्या वेळीही हेच होणार आहे आणि त्यासाठी ‘सौगात-ए-मोदी’ आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणी झाली. त्याआधी शरद पवारांसोबत माझी थोडी चर्चा झाली. शरद पवार हा लढवय्या नेता आहे. ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहे. विधानसभेला पराभव कसा घडवून आणला हे अख्ख्या जगाला ज्ञात आहे. त्यामुळे आम्ही सगळेच एका पराभवाने खचून जाणारे लोक नाहीत. आम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे निवडणूक लढवण्यात आली, घोटाळे झाले, मतदान याद्यांमध्ये घोटाळे केले आणि पैशाचा वापर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. तरीही न खचता पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू आहे, असे राऊत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

…तर तालिबानी पद्धतीप्रमाणे गद्दारांना 100 फटके अन् फाशी, कुणाल कामराला ‘थर्ड डिग्री’ देण्याची भाषा करणाऱ्यांना संजय राऊत यांनी फटकावलं

सध्या काही गाढवं खुर्चीवर बसलेले, त्यामुळे…

दरम्यान, देशातील 100 पॉवरफूल व्यक्तींमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव नाही, याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, हा ठाकरे ब्रँड संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीन गडकरी सत्तेवर असल्याने पॉवरफूल आहेत. तर शरद पवार हे लोकनेते आहेत. शेवटी कुणाला पॉवरफूल करायचे, कुणाला नाही हे पद्मश्रीच्या यादी तयार करण्यासारखे आहे. त्यामुळे याला फार गांभीर्याने घेऊ नका. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेही पॉवरफूल होते. राहुल गांधी, सोनिया गांधीही पॉवरफूल होते. पण सध्या काही गाढवं खुर्चीवर बसलेले आहेत, त्यामुळे गाढवंही पॉवरफूल दिसत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.