
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या मुद्यावर बोलताना, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी मतभेद विसरून एकत्र येणे ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली.
संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. त्यांच्यात कोणतेही वाद, मतभेद किंवा भांडणे नाहीत. महाराष्ट्राच्या शत्रूंना विरोध ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. आता राज ठाकरे यांनी साद घातली आहे आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रहितासाठी ही चांगली गोष्ट आहे.’ उद्धव ठाकरे यांचा मार्ग नेहमी महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱया फौजांशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नये, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत होईल, अशी कोणतीही भूमिका घेऊ नये, असे शिवसेनेचे धोरण आहे. शेतकऱयांसाठीचे काळे कायदे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात असताना त्याबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट होती, असेही संजय राऊत म्हणाले.
आजही काही शक्ती महाराष्ट्राला पाण्यात पाहत आहेत. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे नुकसान व्हावे, यासाठी पडद्यामागून कारस्थाने करत आहेत. अशा माणसांसोबत आपण पंगतीला बसणार नाही, त्यांना घरातही घेणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. महाराष्ट्राचे शत्रू, छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, त्यांना घरात आणि दारात कदापी थारा द्यायचा नाही, अशी भूमिका राज ठाकरे घेत असतील तर त्यांचे स्वागत आहे. त्यानंतर शिवसेना आपली पुढील भूमिका घेईल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
भाजप आणि त्यांचे बगलबच्चे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्व मिटवण्याच्या मागे आहेत. त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचे आहे. अशा वेळी दोन प्रमुख ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचे महाराष्ट्र स्वागतच करत आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीत अनेक विचारसरणींच्या लोकांनी आपापले मतभेद बाजूला ठेवत महाराष्ट्राच्या निर्माणासाठी एकत्र येण्याची भूमिका घेतली होती. आम्हीही त्याच प्रवाहातील कार्यकर्ते आहोत, असे ते म्हणाले.
भाजप आणि एसंशिं गट राज ठाकरे यांचा वापर करून मराठी माणासाला त्रास देण्याची कारस्थाने रचत आहेत. ते राज ठाकरे यांच्या लक्षात आल्यास ते महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचे ठरेल, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रहितासाठी सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवे – रोहित पवार
मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱया महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही, तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे, असं सूचक ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.