लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी यांना टार्गेट केले. पंतप्रधानांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ‘बालबुद्धी’ म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. मात्र याच राहुल गांधी यांच्यामुळे 400 पार…400 पार… अशा घोषणाऱ्या देणाऱ्या भाजपला जेमतेम 200 पार पोहोचता आले. नरेंद्र मोदींनी बहुमत गमावले. हेच राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर बसले असून भाजपच्या हुकुमशाही, एकाधिकारशाहीवर त्यांचा लगाम येणार आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत होते.
विरोधी पक्षनेतेपदाला घटनात्मक दर्जा आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील तर तो राहुल गांधी यांचा अपमान नसून त्या संविधानीक पदाचा अपमान आहे. त्यामुळेच आम्ही संविधान धोक्यात असल्याचे म्हणतो, असेही खासदार राऊत म्हणाले.
मोदी कोणत्याही प्रकारचे संविधान, घटना, नियम पाळायला तयार नाही. ते ज्या नेत्याला बालबुद्धी म्हणताच त्याच नेत्याने लोकसभा निवडणुकीत भाजपला घाम फोडला. त्यामुळे भाजपला बहुमत गमवावे लागले. राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्या भाषणात भाजपचा बुरखा फाडला. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे हे आपण समजू शकतो. पण स्वत: कुबड्यांवर असताना ज्या नेत्याच्या मागे 232-237 खासदारांचे बळ आहे त्याला अशाप्रकारे अपमानीत करणे यात त्यांची संस्कृती दिसून येते, अशी खरमरीत टीकाही राऊत यांनी केली.
…तर अटल बिहारी वाजपेयी यांनीही आणीबाणी लावली असती
संसदेत बोलताना आपलाही माईक बंद केल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. भाजपने कशाप्रकारचे निवडणुका जिंकल्या आणि काही जागा चोरल्या, चोरल्याचा प्रयत्न केला हे सांगताच माझा माईक बंद केल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. आणीबाणीचे सत्य मला सांगायचे होते, पण त्यांनी माझा माईक बंद केला, असे संजय राऊत म्हणाले. 50 वर्षांपूर्वीची आणीबाणी विसरून भविष्यात पाहिले पाहिजे. भुतकाळातील मुद्दे कुठे उकरत बसला आहात? असा सवाल करत खासदार राऊत म्हणाले की, 25 जून 1975 या दिवशी रामलीला मैदानावरून लष्कराने बंड करावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले. यामुळे देशात अराजक माजेल असी भीती इंदिरा गांधी यांना वाटली. पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत अशा प्रकारे तेव्हाचे नेते जाहीरपणे बोलायला लागल्याने इंदिरा गांधी यांच्या जागी अटल बिहारी वाजपेयी असते तरी त्यांनी देशात आणीबाणी लावली असती हे मला काल संसदेत सांगायचे होते, पण त्यांनी मला बोलूच दिले नाही आणि माईक बंद केला.
विधानसभा निवडणुका झाल्यावर महायुतीतील ‘नकली’ वाघांची कातडी अन् मुखवटे ओरबाडून काढू! – संजय राऊत
बुलेटप्रुफ जॅकेट असतानाही…
काँग्रेस सरकारच्या काळात लष्कराकडे बुलेटप्रुफ जॅकेट नव्हते असे विधान पंतप्रधानांनी केले. याचाही समाचार घेत राऊत म्हणाले की, 50 वर्षापूर्वीच्या गोष्टी काढत असाल तर आता जॅकेट असतानाही लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले आहेच ना. तेव्हा जॅकेट नव्हते, आता आहे तरीही लडाखची 24 हजार वर्ग मैल जमीन चिनी सैन्याने आपल्या ताब्यात घेतली आहे. बुलेटप्रुफ जॅकेट असतानाही लडाख, अरुणाचलमध्ये घुसखोरी झाली. याचे उत्तर आधी मोदींनी द्यावे.
View this post on Instagram