‘फुले’ चित्रपट कोणत्याही कट शिवाय लोकांसमोर आणणे ही फडणवीसांची जबाबदारी, संजय राऊत स्पष्टच बोलले

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात 12 बदल सुचवले आहेत. मात्र चित्रपटात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, अशी भूमिका दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी घेतली आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘फुले’ चित्रपट कोणत्याही कट शिवाय लोकांसमोर आणणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे, असे राऊत शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, ‘फुले’ चित्रपट वादात सापडायचे कारण नाही. महात्मा ज्योतिबा फुले, त्यांचे कार्य आणि जीवनचरित्र याबाबत कोणताही वाद असता कामा नये. या देशामध्ये सामाजिक सुधारणांचा पाया कुणी रचला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. त्यांच्या संदर्भात जे चरित्र सरकारने प्रसिद्ध केलेले आहे, त्यावर हा चित्रपट बनलेला आहे. त्या चरित्रातील सगळे प्रसंग चित्रपटात आहेत. या चित्रपटा संदर्भातल्या प्रमुख लोकांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझी चर्चा झाली आहे. चरित्रातील जसेच्या तसे प्रसंग चित्रपटात आहेत. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडायचे कारण नाही. तसे असेल तर मग महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकावर बंदी घालणार का? असा सवालही राऊत यांनी केला.

‘फुले’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते अनंत महादेवन हे अत्यंत जाणकार दिग्दर्शक आहेत. त्यांनी उत्तम प्रकारे असे सामाजिक बांधिलकी असलेले चित्रपट निर्माण केलेले आहेत. सामाजिक बांधिलकी मानणारा हा दिग्दर्शक आहे. ते स्वत: ब्राह्मण असून कोणताही कट न मारता हा चित्रपट जसाच्या तसा रिलिज करण्यावर ते ठाम आहेत. आता हा चित्रपट कोणत्याही कट शिवाय लोकांसमोर आणणे ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितलंय की, ‘फार शहानपणा केला, तर मान उडवेल’, संजय राऊत यांचं ट्विट चर्चेत

सेन्सॉर बोर्डवर त्यांचेच पट्टे गळ्यात बांधलेले लोक आहेत. तुम्हीच नेमलेले लोक असून सगळे भाजपचे चमचे सेन्सॉर बोर्डवर आहेत. त्यामुळे ‘फुले’ चित्रपट जसा बनवला आहे तसा लोकांसमोर, जगासमोर आणणे ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहेत. ती ही जबाबदारी सेन्सॉरवर टाकतील किंवा दुसऱ्यावर टाकतील. आम्ही त्यांची ही ढोंग, सोंग खूप पाहिली आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.