
‘शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. पंतप्रधानपदावर किंवा सत्तेच्या पदावर बसले म्हणून कुणी श्रेष्ठ होत नाही. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते. खरे म्हणजे मोदी त्यांच्या शेजारी बसणार नाहीत असे वाटत होते. कारण मोदी ‘भटकती आत्मा’च्या बाजुला कसे बसतील. पीएमओने त्यांना कसे काय बसू दिले? त्यामुळे मोदींनी दाखवलेला आदर, सन्मान, मान हा एक व्यापार आणि ढोंग आहे. देखल्या देवाला दंडवत अशी मराठीत म्हण आहे’, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना लगावला.
ते पुढे म्हणाले की, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मान आहे असे मोदी नेहमी भाषणात सांगतात. पण बाळासाहेबांची निर्मिती असलेली शिवसेना त्यांनी निर्दयीपणे फोडली ना. शरद पवारांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला ना. मोदींचे उजवे हात अमित शहा महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांचे या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान काय असा प्रश्न विचारला. काका आणि पुतण्याने महाराष्ट्र लुटला असे मोदी म्हणाले. त्यातला पुतण्या आता त्यांच्याच पक्षात आहे.’
‘काल स्वत: काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते, पाणी देत होते. याला आम्ही ढोंग म्हणतो. ज्याच्याविषयी खरा आदर आहे तिथे राजकारण होत नाही. कालसुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दोन-पाच मिनिटांसाठी एक व्यापार, राजकारण झाले. महाराष्ट्राने ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. महाराष्ट्राने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केलेले भाषण गांभीर्याने घ्यावे’, असेही राऊत म्हणाले.
आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोदींनी नाही तर पंतप्रधानांनी केले. देशाच्या राजधानीमध्ये संमेलन झाले. संमेलनाच्या निमित्ताने राजकारण करण्याचा, राजकीय वर्तुळात फिरण्याचा किंवा मिरवून घेण्याचा काही लोकांचा अट्टाहास असतो. एखादे संमेलन राजकारण्यांशिवाय केले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. दिल्लीत संमेलन आहे, त्यामुळे ज्यांची सत्ता आहे त्यांना व्यासपीठावर बोलवावे लागते. त्यांच्या मागेपुढे चौऱ्या ढाळाव्या लागतात’, असेही राऊत परखडपणे म्हणाले.
दक्षिणेतील साहित्यिकांप्रमाणे महाराष्ट्रातील साहित्यिक परखड भूमिका मांडत नाहीत असे विचारले असता राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्रावर, मराठी माणसावर किंबहुना देशावर जेव्हा संकट, अडचणी आल्या तेव्हा गेल्या काही वर्षात मराठी साहित्यिक किंवा कलावंतांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मग बेळगावचा प्रश्न असेल, मुंबईत मराठी माणसावर सुरू असलेल्या अतिक्रमणा प्रश्न असेल, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर नेले जाताहेत तो प्रश्न असेल, मराठी साहित्यिकांनी आणि कलावंतांनी कोणत्याही भूमिका कधीच घेतल्या नाहीत. गेल्या काही वर्षात साहित्यिक आणि कलावंतांनी कोणत्याही भूमिका न घेण्यालाच आपले कर्तव्य मानले आहे. याउलट पश्चिम बंगाल, दक्षिणेकडील राज्यातले साहित्यिक, कलावंत राज्याच्या आणि समाजाच्या हिताचा भूमिका घेतात.’
राहुल गांधी आणि सुनिल केदार यांच्यासाठी जो न्याय वापरला तोच न्याय आता माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यानंतर वापरण्यात यावा अशी मागणी होत आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ‘राहुल गांधी यांना गुजरातमधील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली तेव्हा ताबडतोब त्यांची खासदारकी रद्द केली, त्यांचे दिल्लीतील घर काढून घेतले. महाराष्ट्रात सुनिल केदार यांच्याबाबतीत आणि उद्दर प्रदेशमध्ये सपाच्या काही आमदारांबाबतीतही हेच घडले. न्याय हा सगळ्यांसाठी सारखा नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय ही गंभीर गोष्ट आहे.’