
“माणसाला सुपरमॅन व्हायचं असतं. त्यानंतर तो देवही बनू पाहतो”, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. मोहन भागवत यांनी यात कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केले. ‘सुपरमॅन’च्या पायाखालच्या बहुमताची सतरंजी ‘कॉमनमॅन’नं खेचली. मोहन भागवत यांच्या विधानावर भाजपने चिंतन करावे, असा टोला राऊत यांनी लगावला. शुक्रवारी सकाळी ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.
देशात एक व्यक्ती आहे जी स्वत:ला विष्णुचा तेरावा अवतार समजते. त्या व्यक्तीला असे वाटते की मीच प्रभू श्रीराम यांचे बोट धरून त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो. मी नसतो तर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. ती व्यक्ती स्वत:ला सुपरमॅन समजते. स्वत:ला नॉन-बायोलॉजीकल, अजैविक पद्धतीने जन्माला आल्याचे सांगते. मला वरून देवाने जन्माला घातले असे म्हणत देशातील लोकांना भ्रमित करते. रशिया-युक्रेन युद्धही मीच थांबवले असे म्हणते. पण ती व्यक्ती मणिपूरचा आणि जम्मू-कश्मीरमधील हिंसाचार थांबवू शकत नाही. मोहन भागवत त्याच व्यक्तीविषयी बोलले आहेत, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, काही लोकं स्वत:ला सुपरमॅन समजतात. पण या सुपरमॅनच्या पायाखालची बहुमताची सतरंजी कॉमनमॅनने खेचून घेतली. त्यामुळे कॉमनमॅनच सुपरमॅन आहे असे आम्ही मानतो. मोहन भागवत यांनी जे मत व्यक्त केलेले आहे त्यावर देशाने आणि भारतीय जनता पक्षानेही चिंतन केले पाहिजे.
रेल्वेमंत्र्यांचा समाचार
उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे चंदीगड-दिब्रुगड एक्सप्रेसचे 15 डब्बे घसरले आणि यात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. यावरही राऊत यांनी परखड शब्दात भाष्य करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा समाचार घेतला. अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यापासून अपघातांची मालिका सुरू आहे. यात आतापर्यंत 300 प्रवासी मरण पावले असून हा आकडा अत्यंत गंभीर आहे. सरकार बुलेट ट्रेन, मेट्रो, सुपरफास्ट ट्रेन आणत आहे, पण सर्वसामान्य लोकं ज्या लोकल ट्रेनने, पॅसेंजर एक्सप्रेसने प्रवास करते त्याच्या सिग्नल यंत्रणेसाठी, रुळांसाठी काहीही करायला तयार नाही. सरकार बुलेट ट्रेनचा दिखावा करत असून त्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातोय. पण लोकल ट्रेन, पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी सरकारकडे कोणत्याही योजना नाही. रेल्वेसुद्धा श्रीमंतासाठी चालवायची असून ‘400 पार’च्या आकड्यात गुंतल्याने त्यांना ‘300 पार’ गेलेला रेल्वे प्रवाशांचा मृत्यू दिसला नसेल, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
जिथे ज्याचा प्रभाव, ताकद तो त्याचा मतदारसंघ
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जागावाटपासाठी 96-96-96 हा फॉर्म्युला वापरणार असल्याच्या बातम्या सुत्रांच्या हवाल्याने चालवल्या जात आहेत. मात्र यात दम नसून तिन्ही पक्ष आपापल्या जागांची चाचपणी करत आहेत. महाराष्ट्रात 288 जागा असून सर्वच पक्षांना आपली ताकद कुठे आहे, कुठे लढू शकतो याची चाचपणी करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आम्ही बसू आणि जागावाटपाचा निर्णय घेऊ, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
पंतप्रधानांच्या उंचीची खिल्ली उडवल्याने महिला पत्रकाराला साडे चार लाखांचा दंड
मुंबई, कोकण शिवसेनेचा गड
मुंबईत शिवसेना 25 जागा लढणार आहे का? या प्रश्नाचेही राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण मुंबई नेहमीच शिवसेनेचा गड राहिलेला आहे. मुंबई महानगरपालिका असो किंवा विधानसभा किंवा लोकसभेच्या जागा असो, शिवसेना जिंकत आलेली आहे. विदर्भात काँग्रेसला जास्त जागा मिळतात, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळतात. प्रत्येक पक्षाचा गड असतो, प्रभाव असतो. मुंबई, कोकणात कायम शिवसेनेचा प्रभाव राहिला असून त्यानुसार जागावाटप होईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
View this post on Instagram