विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. 11 जागांसाठी महाविकास आघाडीचे 3, तर महायुतीचे 9 असे 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाची विकेट जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून सत्ताधाऱ्यांकडे सत्ता आणि पैसा असला तरी लोकमत आमच्याबाजूने असल्याने महायुतीचेही आमदार फुटू शकतात, असे म्हटले. तसेच महाविकास आघाडीचे तिनही उमेदवार विजयी होतील असा पुनरुल्लेखही राऊत यांनी केला.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत 23 मतांचा कोटा आहे. सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे तिनही उमेदवार निवडून येतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत. आम्ही ज्या प्रकारची रणनिती आणखलेली आहे त्यानुसार आमचे तिनही उमेदवार निवडून येतील.’
काँग्रेसची मतं फुटू शकतात? असे विचारले असता राऊत म्हणाले की, काँग्रेसचीच का? भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचीही मतं फुटू शकतील असे आपण का समजू शकत नाही. त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे. पण लोकमत आमच्याबाजूने आहे हे लोकसभेत दिलस्यामुळे त्यांचेही आमदार फुटू शकतात किंवा वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसचीच मतं फुटणार या भ्रमात कुणी राहू नये, असा इशाराही राऊत यांनी दिला.
पोलीस स्थानकात गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. याचाही राऊत यांनी समाचार घेतला. गणपत गायकवाड तुरुंगातून येऊ शकतात. पण अनिल देशमुखही तुरुंगात होते. त्यांना किंवा नवाब मलिक यांना मतदानासाठी येऊ दिले नाही. पण गणपत गायकवाड येऊ शकतात. यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
गुजरातमध्ये एका खासगी नोकरीसाठी बेरोजगार तरुणांची झुंबड उडाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यावरून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. गुजरातमध्ये खासगी नोकरीच्या 40 जागांसाठी हजारो तरुण रांगेत उभे आहेत. हेच गुजरात मॉडेल आहे. मोदींनी बेरोजगारांच्या बाबतीत जो खेळ केला आहे त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. मुंबई, महाराष्ट्रातील असंख्या उद्योग पळवूनही मोदी गुजरातच्या लोकांना रोजगार देऊ शकले नाहीत. ही चेंगराचेंगरी पाहिल्यावर मोदींचे गुजरात मॉडेल विनाशाकडे नेणारे आहे. मोदी रशिया, ग्रिस, ऑस्ट्रियाला जातात आणि हिंदुस्थानमध्ये कसा विकास केलेला आहे याची प्रवचनं झोडतात. तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी गुजरातचा व्हिडीओ पाहिला पाहिजे, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.
View this post on Instagram