आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता; ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती! – संजय राऊत

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे 9, तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. शेकापचे जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीमध्ये आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

मिंधे गट आणि अजित पवार गट विजयाचा कसला एवढा उन्माद करत आहे? भाजपचे 103 आमदार होते आणि त्यांना पाठींबा देणाऱ्या आमदारांनी त्याची लोकं निवडून आणली. दोन गद्दार गटांनीही आपल्या दोन-दोन गद्दारांना निवडून आणले. गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी झालेली ही निवडणूक होती. यात महाविकास आघाडीला काय फटका बसला? काँग्रेसने काँग्रेसचा, तर शिवसेनेकडे कोटा नसतानाही काँग्रेसच्या मदतीने उमेदवार निवडून आणला, असे खासदार राऊत म्हणाले.

काँग्रेसची 7 मतं फुटल्याचे लपून राहिलेले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हे मान्य केले आहे. त्यामुळे ही मतं फुटल्याचे आश्चर्य नाही. ती आधीच फुटलेली असून गेल्या विधान परिषद निवडणुकीच काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारेही हीच 7 लोकं आहेत. तेव्हाही या लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला म्हणणे चूक आहे, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे एकही मत फुटले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचीही सर्व मतं जयंत पाटील यांना पडली. पण काँग्रेसची 7 मतं फुटली. हे 7 जण दोन वर्षांपासून काँग्रेसबरोबर फक्त कागदार आहेत. ती नावेही समोर आली असून हंडोरे यांचाही पराभव याच लोकांनी केला होता. त्याच 7 जणांना घेऊन सत्ताधाऱ्यांनी कालचा खेळ केला. त्यामुळे मिंध्यांनी महाराष्ट्र जिंकला असे नाही. सरकार आहे, सत्ता आहे. लहान पक्ष, अपक्ष आहेत. ते सत्तेबरोबर राहतात. काल आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता. 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत….काहींना दोन एक जमीनही… ज्यांच्याकडे पैसा आहे. ज्यांची समृद्धी वाढलेली आहे. त्या समृद्धीतून हा पैसा जावू शकतो. पण ही निवडणूक सोपी नव्हती. ही निवडणूक पैशाची, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. आम्ही आमच्याकडे असणाऱ्या मतांच्या ताकदीवर लढलो आणि जिंकलो. आम्हाला आमची मतं मिळाली.

महाविकास आघाडी मजबूत असून दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहे. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ होते आणि त्यांनी त्यांचा उमेदवार निवडून आणला. शिवसेनेकडे संख्याबळ नव्हते. 15 मतं होती. तरीही आम्ही नार्वेकरांना उतरवले आणि काँग्रेसच्या मदतीने निवडून आणले. थोडेसे गणित जमले असते तर जयंत पाटीलही जिंकू शकले असते. पण गणित जमू शकले नाही. राष्ट्रवादीची सगळी मतं त्यांना पडली. आम्हीही दुसऱ्या क्रमांकाची मतं त्यांना दिली. पण थोडंसं गणित चुकलं. जयंत पाटील यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केले, पण आमच्याकडे जी मतं होती त्यातच आम्हाला खेळावे लागले, असेही राऊत म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीवला लक्ष्य करणाऱ्या आशिष शेलारांचाही राऊत यांनी समाचार घेतला. शेलार यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. महाराष्ट्रात लोकसभा हरलात त्यावर त्यांनी बोलावे. महाराष्ट्रातील जनतेने धूळ चारली, मुंबईत शिक्षक आणि पदवीधर निवडणूक शिवसेना जिंकली, त्यावर त्यांनी बोलावे. आम्ही आमच्या जागा जिंकल्या. तिसऱ्या जागेसाठी प्रयत्न केला, पण प्रयत्न कमी पडला, असेही राऊत म्हणाले.