महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार आहे. तारीख जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागेल. केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा होणार असून तारखांसदर्भात आम्ही प्रतिक्षेत आहोत. एकाच टप्प्यात ही निवडणूक व्हायला हवी, मात्र सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याने चर्चेतून तारखा ठरल्या असून महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराकडे पैशाचा पहिला हप्ताही पोहोचला आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.
दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रा सारख्या महत्त्वाच्या राज्याच्या निवडणुका निष्पक्षपणे घ्याव्यात. कोणत्याही दबावाखाली निवडणुका घेऊ नयेत. सत्ताधाऱ्यांचे जे विरोधक आहेत त्यांना अकारण छळू नये, त्रास देऊ नये. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात खास करून पैशाचा आणि यंत्रणेचा दुरुपयोग निवडणुकीत केला जातो तो रोखण्यासाठी आयोगाने जागरूक रहावे ही माफक अपेक्षा आहे.
निवडणूक आयोग तारखा जाहीर करेल आणि आचारसंहिता लागेल म्हणून राज्यातील काही सत्ताधारी पक्षाने आपापल्या उमेदवारांपर्यंत पैशाचे वाटप काल रात्रीपर्यंत करून घेतले. प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराकडे 10-15 कोटी रुपये पोहोचल्याची पक्की खबर आपल्याकडे असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
निवडणुकीची घोषणा होईल, आचारसंहिता लागेल याची पक्की खबर सत्ताधाऱ्यांना असते. त्यामुळे सरासरी 10-15 कोटी रुपयांचा पहिला हप्ता रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतेक सर्व मतदारसंघात पोहोचला आहे, ही माहिती मी निवडणूक आयोगालाही देत असून त्याचे काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. किंबहुणा हे सगळे वाटप झाल्याची माहिती आल्यावरच निवडणुकीची घोषणा होतेय का? अशी शंकाही राऊत यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात किती टप्प्यात निवडणूक व्हायला हवी असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मोकळेच आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचे परदेशात फिरून झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये ‘लॉ अँड ऑर्डर’च्या अडचणी आल्या तरी निवडणुका एका टप्प्यात व्हायला हरकत नाही. कारण सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याने चर्चेतून तारखा ठरलेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांना जिथे जिथे पैसे पोहोचवायचे तिथे पैसे पोहोचलेले आहेत.
हरयाणाच्या चुका महाराष्ट्रात टाळा; काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना स्पष्ट सूचना
दरम्यान, महाराष्ट्रात 288 जागा असून 210 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालेले आहे. राहिलेल्या जागांवर उद्याच्या दिवसात निर्णय घेऊन मोकळे होऊ असेही राऊत यावेळी म्हणाले. तसेच हरयाणाच्या चुका महाराष्ट्रात टाळा, महाविकास आघाडीसाठी, सत्ता आणण्यासाठी लढा, मुख्यमंत्रीपदासाठी लढू नका, अशा स्पष्ट सूचना काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना केल्या आहेत. काँग्रेस हायकमांडने चांगली भूमिका घेतल्याचे राऊत म्हणाले.