“भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरतात, हिम्मत असेल तर…”, संजय राऊत यांचं थेट आव्हान

‘भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरतात. भाजप आणि त्यांच्यासोबत असणारे लोक हरणार आहेत म्हणून महाराष्ट्रातील 14 महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पाडल्या आहेत. हिम्मत असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या घ्या’, असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले.

आगामी विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ‘मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. तीन वर्षापासून निवडणूक झालेली नाही. महानगरपालिकेमध्ये एकही लोकप्रतिनिधी नाही. प्रमुख 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत आणि आता तारीख देत आहेत. तिथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तारखांवर तारखा देत आहेत आणि इथे मुख्यमंत्री तारीख देत आहेत. हे सर्व संगनमताने सुरू आहे.’

‘आपण काहीतरी करू शकू हा विश्वास होईल तेव्हाच ते निवडणूक घेतील. लोकशाहीची स्थिती अशी बनलीय की निवडणुकाही त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. मात्र लोकसभेला महाराष्ट्रात काय झाले, तेच विधानसभेलाही होईल. तुम्ही तारखा देत रहा. ज्या तारखेला निवडणूक होईल त्या तारखेला तुम्ही घरी बसाल’, असा इशाराही राऊत यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळला आहे का? निकाल आमच्या बाजूने लागणार, शिवसेना पक्ष आणि चिन्हा आम्हाला मिळणार हे ते आधीच सांगतात. दुसरीकडे पंतप्रधान सरन्यायाधीशांकडे जातात. त्यामुळे या देशात काहीही होऊ शकते. देशातील संविधानिक संस्थआ त्यांच्या खिशात असून हाच संविधानासाठी सर्वात मोठा धोका आहे.’

गद्दारी आणि लुटमारीच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा; संजय राऊत यांनी मिधेंना टोलवले

दरम्यान, आगामी अधिवेशनात वन नेशन, वन इलेक्शनवर चर्चा होऊन विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. ‘जे लोक राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही, ते वन नेशन, वन इलेक्शनच्या बाता करत आहेत. ते महाराष्ट्रातील 14 महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही एकत्र घेऊ शकत नाहीत. ही लोक बकवास आहेत’, असेही राऊत म्हणाले.