विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा तूर्त 85-85-85 असा फॉर्म्युला ठरला आहे. काही जागांवर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू असून अखेरच्या क्षणी आपापसात जागांची अदलाबदल होऊ शकते, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेना पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी उभा असून आमच्याविरोधात दिल्लीची चाकरी करणारे लोक उभे आहेत, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.
गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, निवडणुकीत लढावे लागते. महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक एका युद्धासारखी लढली जाईल. कालपर्यंत जे मोदी, शहांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही अशा गर्जना करत होते ते अप्रत्यक्षपणे त्यांना महाराष्ट्र गिळता यावा म्हणून तर मदत करत नाही ना हे राज्याची जनता काळजीपूर्वक पाहणार आहे.
शिवसेना हा असा पक्ष आहे ज्याने कधीही महाराष्ट्रद्रोह्यांशी हातमिळवणी केली नाही. शिवसेनेने छातीवर वार झेलले, लढत राहिली आणि यापुढेही लढत राहील. या लढाईत जे आमच्याबरोबर येतील ते महाराष्ट्राचे आणि जे आमच्याबरोबर येणार नाहीत ते महाराष्ट्राच्या शत्रुंना निर्णायक क्षणी मदत करत होते याची नोंद राज्याच्या इतिहासात होईल, असेही ते म्हणाले.
शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी उभा आहे. निवडणुकीला आम्ही उभे नसून महाराष्ट्र उभा आहे. आमच्याविरुद्ध जे उभे आहेत ते दिल्लीचे चाकरी करणारे लोक आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काही देणेघेणे नाही. खरे म्हणजे यावेळेला महाराष्ट्राने एक व्हायला पाहिजे, तरच दिल्लीचे सुलतानी संकट आपण रोखू शकू. पण दुर्दैवाने अनेकांना दिल्लीश्वरांनी विकत घेऊन निवडणुकीत उभे केले आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
आज बऱ्याच ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून फार घोळ घालून चालणार नाही. शेवटच्या क्षणीही काही मतदारसंघात अदलाबदल होऊ शकतो. महाराष्ट्रात आम्ही 175 जागा जिंकू हीच आमची बेरीज आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. तसेच 85 पर्यंत आम्ही आलो असून अजून 25 ओव्हर खेळायच्या बाकी आहेत. 2 षटकार आणि 1 फोर मारला तर सेंच्युरी होईल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
काँग्रेस, शिवसेनेमध्ये वाद असल्याच्या चर्चा फेटाळत महायुतीतील तीन घटकपक्ष सागर बंगल्यावर रोज जिलब्या खायला बसतात का? असा खरमरीत सवालही राऊत यांनी केला. आघाडी-युतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असल्यावर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची ताकद असते आणि ती जागा आम्हाला मिळावी यासाठी शेवटपर्यंत तिथे आपापल्या भूमिका लोक मांडत असतात. याचा अर्थ टोकाचे मतभेद आहेत असे होत नाही. तसेच काही ठिकाणी फक्त जागांची आपापसात बदल होऊ शकतात. याच्या पलिकडे फार काही घडेल असे मला वाटत नाही, असेही राऊत म्हणाले.