इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल संजय राऊत यांचे मोठे विधान, वाचा काय म्हणाले

राज्यसभेचे सभापती हे भाजपचा अजेंडा चालवतात अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलून जर आघाडी मजबूत होत असेल तर त्यावर विचार करायला हरकत नाही असेही संजय राऊत म्हणाले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुणीच प्रश्न उपस्थित केलेले नाही. राहुल गांधी हे काँग्रेस आणि आम्हा सर्वांचे नेते आहेत. देशात मोदी सरकारविरोधात जे वातावारण निर्माण झाले आहे त्यात राहुल गांधी यांचे योगदान मोठे आहे. इंडिया आघाडीतले आमचे काही मित्र पक्ष आहेत त्यात तृणमूल काँग्रेस, राजद, समाजवादी पक्ष असतील. त्यांचीही काही मतं असू शकतात. इंडिया आघाडीत हे सर्व पक्ष आहेत फक्त काँग्रेस नाही. जर कुणी मत मांडून इंडिया आघाडीला पुढे नेत असेल, नेतृत्व बदल करून आघाडी मजबूत होत असेल तर त्याचा विचार झाला पाहिजे. काँग्रेस पक्षानेही या मताचा विचार करून आपलं मत मांडलं पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.

राज्यसभेचे सभापती हे भाजप नेते आहेत. ते भाजपचा अजेंडा राबवत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच राज्यसभेचे सभापती हे निष्पःक्ष असायला हवेत. जगदीप जनखड हे सन्मानीय व्यक्ती असून ते संविधानिक पदावर बसले आहेत. पण त्यांच्यावर दबाव आहे. आणि ज्यांच्यावर दबाव आहे ते निष्पःक्ष काम करू शकत नाहीत असेही संजय राऊत म्हणाले.