
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी माझ्यावर भाजपकडून दबाव टाकण्यात असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवणारी छत्री आहेत, अशा शब्दात राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवणारी छत्री आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री नेमले गेले, ते कोणालाही माहिती नाहीत. महाराष्ट्रातही अनेक अनुभवी लोकांना डावलून मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांना बसवण्यात आले. तेव्हा ते राज्यातील लोकांना माहिती झाले. त्यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी मिळाली होती. मात्र कपट, कारस्थानाचे दळभद्री आणि महाराष्ट्राला कलंकीत करणारे राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यामुळे राज्याची बहुसंख्या जनता त्यांना खलनायक मानते. याला ते स्वत: जबाबदार आहेत.
फडणवीस यांनी नेतृत्व करण्याची उत्तम संधी गमावली. भाजपने कपटनितीने महाराष्ट्राचे केलेले नुकसान भरून येणे सोपे नाही. त्यासाठी आम्हाला पुन्हा सत्तेवर यावे लागेल आणि जी घाण फडणवीस व त्यांच्या लोकांनी निर्माण केली ती स्वच्छ करावी लागेल. राज्याच्या जनतेने आम्हाला लोकसभेला जसा आशीर्वाद दिला तसा विधानसभेलाही देईल, असा विश्वास व्यक्त करत राऊत पुढे म्हणाले की, फडणवीस यांनी विरोधकांना बदनाम, खतम करण्यासाठी आणि तुरुंगात टाकून राज्य करण्यासाठी गृहखात्याचा गैरवापर केला. त्यांच्या अवतीभवतीही भ्रष्ट, कलंकीत लोकं आहेत. चांगला गृहमंत्री असता तर पाच मिनिटाक अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात असते. पण त्यांच्या सोबतीने ते राज्य करत आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले आले तरी शिवसेनेला खतम करता येणार नाही; संजय राऊत यांनी ठणकावले
दरम्यान, आज निती आयोगाची बैठक असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. यावरही राऊत यांनी भाष्य केले. महाराष्ट्रावर 8 लाख कोटींचे कर्ज असून हे कर्ज घेऊन अर्थमंत्री, मुख्यंमत्री निती आयोगापुढे जाणार आहेत. कर्जाचा डोंगर असतानाही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी अनेक घोषणा मिंधे सरकार करत आहे. निती आयोग खरेच नितीमान असेल तर हे पैसे कुठून आणणार? असा सवाल ते मुख्यमंत्र्यांना करतील, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर कशा पद्धतीने होतोय हे दिसत आहे. आमदार-खासदार, नगरसेवकापासून ते पदाधिकाऱ्यांना विकत घेण्यासाठी शिंदे गटाने तीन-चार हजार कोटी खर्च केले. राज्य सरकारचा हा पैसा लिक्विड कॅशच्या माध्यमातून शिंदे गटाकडे गेला आणि राजकारणात आला. भ्रष्टाचाराची गंगा कशी वाहते याचे महाराष्ट्र उत्तम उदाहरण आहे. आणि आम्ही भ्रष्टाचार सहन करणार नाही म्हणणारे नरेंद्र मोदी त्यांच्याच व्यासपिठावर टाळ्या वाजवायला येतील, असे म्हणत राऊत यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येईल असा ठाम विश्वास पुन्हा व्यक्त केला.