चित्रपटाद्वारे राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिध्यांवर संजय राऊत यांचा निशाणा, म्हणाले…

पहिल्या भागात सन्माननीय आनंद दिघे यांचा महानिर्वाण दाखवला आहे. आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असून खोट्याला उजाळा देऊन मिध्यांना आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकवायचे आहेत. त्याच्यामुळे आनंद दिघेंसारख्या महान, निष्ठावान शिवसेना नेत्याचा वापर सुरू आहे. पण चित्रपटाद्वारे राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करणार असाल, तर भविष्यामध्ये तुम्हीही त्या आगीचे चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाहीत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

आनंद दिघे यांना आम्ही अधिक ओळखतो. जे आता त्यांच्यावर मालकी असल्यासारखे वागताहेत, फिरताहेत, सिनेमे काढताहेत त्यांच्या मानत आनंद दिघे यांच्याविषयी काय भावना होत्या, काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपवून फिरावे लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, आज गुरुपौर्णिमा असून हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्य बोला आणि इमानाने जगा असे सांगितले आहे. बेईमान लोकं आनंद दिघे यांना गुरू मानून त्यांचे खोटे चित्र उभे करत असतील तर तो आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरू हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे.

आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला आहे. आनंद दिघे यांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचे हिंदुत्व होते. आनंद दिघे यांनी जे हिंदुत्व स्वीकारले ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच हिंदुत्व होते आणि आम्हीही तेच स्वीकारले. ठाण्यात, टेंभी नाक्यावर त्यांचे हिंदुत्व वेगळे आणि आमचे हिंदुत्व वेगळे असे काही झाले नाही. आज हिंदुत्वाच्या ज्या वेगळ्या चुली मांडल्या आहेत त्या आनंद दिघे यांनीही मान्य केल्या नसत्या. चित्रपट वगैरे सगळे बोगस, भंपक असून आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशाप्रकारचे चित्रपट याआधीही बनवले गेले आहेत. ‘कश्मीर फाईल्स’, ‘ताश्कंद फाईल्स’ ही त्याची उदाहरणे. भाजपच्या लोकांनी असे अनेक चित्रपट बनवले. एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याचा मुलामा देण्यासाठी या माध्यमांचा वापर करण्यात आला आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केले.

काही नासके आंबे निघाले

आयुष्यात एक गुरू असायलाच हवा. जो तुमचे बोट धरून तुम्हाला पुढे नेईल. ज्ञान, शहाणपण, स्वाभीमान, निष्ठा, इमान याबाबत योग्यवेळी योग्य मार्गदर्शन करेल. नुसते मार्गदर्शन नाही तर माणसांची जपणूक आणि घडवणूक करेल. शिवसेनाप्रमुखांनी ते केले म्हणून आज आमच्यासारखी लोकं एका निष्ठेने तुमच्यासमोर उभी आहेत. बाळासाहेब महाराष्ट्राचे, हिंदुत्वाचे गुरू होते. पण त्यातून काही नासके आंबे निघाले आणि बाहेर गेले. माझं आव्हन आहे की त्यांनी बाळासाहेबांचा फोटो गुरू म्हणून लावू नये. तो या महान गुरुचा अपमान होईल, असेही राऊत म्हणाले.

Video – मुंबईला ‘अदानी सिटी’ आम्ही होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे कडाडले

हीच आमची गुरुदक्षिणा, गुरुवंदना

नेते आणि गुरू म्हणून बाळासाहेबांच्या चरणी आम्ही कायम मस्तक ठेवले. असा गुरू होणे नाही. झाले बहू, होतील बहू, परंतु यासम हाच! बाळासाहेबांनी महाराष्ट्र घडवला, लाखो निष्ठावंतांची फौज उभी केली. त्यांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत फुलवली. निष्ठेची मशाल हाती दिली. ते आज आमच्यात नसले तरी आजही आम्ही ती मशाल पेटत ठेवलेली आहे आणि पेटतच ठेऊ हीच आमची त्यांना गुरुदक्षिणा आणि गुरुवंदना आहे, असेही राऊत बाळासाहेबांना वंदन करत म्हणाले.

महाविकास आघाडीचेच सरकार येणार

पुण्यात भाजपच्या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत. यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते देशाचे गृहमंत्री आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होत आहेत. नागरिकांवर हल्ले होत आहेत. मणिपूर अजूनही पेटलेले आहे. उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. अशावेळी देशाचे गृहमंत्री राजकीय कारणांसाठी दिवस-दिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात हे चित्र काही चांगले नाही. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू-कश्मीरमध्ये लक्ष घातले तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल. गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातील निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणून त्यांना खतम करा. गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या, पंतप्रधानांनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला किंवा पुतीनला बोलवा, पण या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार येईल, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.