
‘2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीमधून युती तोडायचा कार्यक्रम घेऊन आले होते. युती तोडायची हे त्यांचे ठरले होते. हिंदुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते. याचा फायदा घ्यावा आणि या निमित्ताने शिवसेनेला आपण संपवावे ही भाजपची योजना होती. भाजप हिंदुत्ववादी असल्याचे दाखवत असले तरी शिवसेनेला संपवण्याचे फर्मान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून येथे आले आणि चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत घालत बसले’, असा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.
2014 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार होतो. आम्ही 147 जागा द्यायला तयार होतो, पण शिवसेना 151 वर अडून बसली आणि युती तुटली, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘आता 2025 सुरू असून 2014 आणि 2025 दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. तसे तर 2019 वरही आपण बोलायला हवे, तेव्हा काय झाले होते? 2014 साली भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीतून युती तोडायचा कार्यक्रम घेऊन आले होते. युती तोडायची त्यांचे ठरले होते. त्यामुळे शेवटपर्यंत फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते.’
147, 151 हा आकडा सोडून द्या. जेव्हा भाजपकडे पोस्टर लावायलाही माणसं नव्हती तेव्हा गावागावामध्ये आम्ही भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले, मिरवले. पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या विजयानंतर भाजपला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आपल्याबरोबर असतील तरच या देशामध्ये आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो, म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महान हृदयाचे नेते होते. त्यांनी सांगितले की हिंदुत्वाच्या मतांची विभागणी नको, म्हणून आपण एकत्र काम केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये निवडणुका लढणार होतो. शिवसेनाप्रमुखांच्या नावाची एक लाट निर्माण झाली होती. शिवसेनेच्या नावाचे तुफान निर्माण झाले होते. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्ये प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये लोकसभेच्या 60-65 जागा लढायचे आमचे नक्की होते आणि आम्हाला खात्री होती की तेव्हा आमच्या किमान 40 जागा या लाटेत निवडून आल्या असत्या. आमची तयारी सुरू असतानाच हे आम्ही जाहीर केले तेव्हा भाजपचे धाबे दणाणले.
अटल बिहारी वायपेयी यांचा बाळासाहेबांना फोन आला. अटलजींनी बाळासाहेबांना सांगितले की, ‘बालासाहब आप चुनाव लढ रहे हो पुरे देश में और उससे भाजपाको नुकसान हो सकता है. हिंदुत्व के वोट बिखर जायेंगे और भाजपा हार जायेगी. कांग्रेस को फायदा होगा. तो मे आपसे विनती करता हू की आप कृपया आपके उम्मीदवार पिछे लिजिये.‘ बाळासाहेब महान हृदयाचे माणूस होते. अटलजींचा सन्मान राखला पाहिजे असे म्हणत त्यांनी उमेदवार मागे घ्यायला सांगितले. अन्यथा राष्ट्रीय स्तरावर आम्हीच होतो. पण शिवसेनेने प्रत्येक वेळी त्याग केला, असेही राऊत यावेळी म्हणाले.
2014 साली एका एका जागेवर 72-72 तास चर्चा चालली होती. ओम माथूर तेव्हा भाजपचे प्रभारी होते. आम्ही हा सगळा खेळ पहात होतो. पण मी एक नक्कीच सांगेल की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना-भाजप युती तुटू नये या मताचे होते. तेव्हा युती करण्यासंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती. पण तरीही दिल्लीवरून जो कार्यक्रम आला होता त्या नुसार युती तुटली, असेही राऊत म्हणाले.