शिदेंची गरज आता संपली आहे, भाजप त्यांचा गटही फोडू शकतो! – संजय राऊत

शिंदेपर्व संपले आहे. त्यांची गरज आता संपली आहे. आता त्यांना फेकून दिले असून ते पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजप आता शिंदेंचा गटही फोडू शकतो. हीच भाजपची भूमिका राहिलेली आहे. जे त्यांच्यासोबत काम करतात त्यांचाच पक्ष फोडतात, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला.

ते पुढे म्हणाले की, बहुमत असतानाही 13-14 दिवस सरकार बनवू शकले नाहीत. याचा अर्थ भाजपात किंवा महायुतीमध्ये काहीतरी गडबड आहे. उद्यापासून ही गडबड दिसू लागेल. तसेच हे महाराष्ट्र किंवा देशहितासाठी काम करत नसून आपल्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. महाराष्ट्रात लागलेल्या निकालाविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. निवडणुकांवरचा लोकांचा विश्वास उडाला. निकाल धक्कादायक आहेत आणि त्या धक्क्यातून या राज्याची जनता अद्याप सावरलेली नाही. अनेक गावात ‘मॉक पोल’ सुरू आहेत. हे मॉक पोल रोखावे म्हणून गावागावात 144 कलम लावून लोकशाहीची गळा घोटला जातोय.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होत आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. यापुढे जोपर्यंत आपण त्या पदावर आहात तोपर्यंत हे महान राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याचे आणि त्याची लूट न होऊ देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गेल्या अडीच-तीन वर्षामध्ये महाराष्ट्राची जी लूट झाली… उद्योग, रोजगार, संपत्ती, सार्वजनिक उपक्रम या सगळ्यांवर दरोडे पडले. ही दरोडेखोरी थांबवून महाराष्ट्राला पुन्हा वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी नवीन मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांनी जर अशा प्रकारचे कार्य केले तर नक्कीच महाराष्ट्र त्यांची एक चांगला मुख्यमंत्री म्हणून नोंद ठेवेल, असेही राऊत म्हणाले.

आज तिघे शपथ घेणार आहेत. मात्र शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही हे स्पष्ट नाही. याबाबत विचारले असता राऊत ठामपणे म्हणाले की, शिंदे 100 टक्के शपथ घेतील. शपथ टाळण्याची आणि दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही. अडीच तीन वर्षापूर्वीही ती हिंमत नव्हती, म्हणून या सगळ्यांनी पक्ष सोडला. त्यांना मंत्रिमंडळात रहावेच लागेल. सत्तेशिवाय काही माणसे राहू शकत नाही.

एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, अजित पवार यांचे राजकारण वेगळे आहे. त्यांनी दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलेले आहे. तर एकनाथ शिंदे आज 5 वाजेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री होतील आणि नवीन मुख्यमंत्र्यांचे पर्व सुरू होईल. त्यानंतर राज्यात पुढील 5 वर्ष धुमशान पहायला मिळणार आहे. यात महाराष्ट्राचे हित आणि अहित किती हे येणारा काळ दाखवेल.

दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघात मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. मराठी माणसाने हा विषय खूप काळजीपूर्वक पहायला पाहिजे. मलबार हिलच नाही तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी असे प्रकार घडत आहेत. ठाणे, घाटकोपर, मुलुंडला असे प्रकार घडले आहे. त्यामुळे महाराष्ट्राविरुद्ध उठाव करण्याची कोणाची प्रेरणा आहे हे आज शपथ घेतल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू. आपण मराठी राज्याचे प्रधान आहात. मराठी माणूस, भाषा, संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. मराठीला अभिजात भाषेचे दर्जा दिला म्हणजे आपले काम संपले असे होत नाही. मराठी माणूस मुंबई, महाराष्ट्रात टिकवणे ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, असेही राऊत फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.