Delhi Election 2025 – दिल्ली निवडणुकीत भाजपकडून पैशांचा मोठा खेळ सुरू, संजय राऊत यांचा घणाघात

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 33.31 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दिल्लीत काही ठिकाणी बोगस मतदानाच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच पैसे वाटल्याचेही आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्लीत पैशांचा खेळ सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

दिल्लीतील विकासकामं पाहता अरविंद केजरीवाल यांनाच मतं मिळाली पाहिजेत. महाराष्ट्रातही मतं आम्हालाच मिळतील असा आमचा विचार होता. पण मतं कुठे गायब झाली? हे कोणालाच माहिती नाही. भाजपकडे आणि त्यांच्या नेत्यांकडे काय जादू आहे? असे म्हणत संजय राऊत यांनी सणसणीत टोला लगावला.

टीव्हीवर आणि सोशल मीडियात एकच चर्चा सुरू आहे, इकडे पैसे वाटले जाताहेत, तिकडे पैसे वाटले जाताहेत, ही काही निवडणूक नाही. हा पैशाचा मोठा खेळ सुरू आहे. हा खेळ दिल्लीतही सुरू आहे. आम आदमी पार्टीला निवडणुकीत चांगल्या जागा मिळतील आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या जनतेच्या सेवेत हजर होतील, असे संजय राऊत म्हणाले.