देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरती केली. यानंतर सरन्यायाधीशांच्या या कृतीविरोधात ज्येष्ठ वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हा संदर्भातील खटला, आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीशांची खासगी भेट यामुळे न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. यांसदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे.
सोलापूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘चंद्रचूड हे जोपर्यंत या खूर्चीवर आहेत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही’, असं रोखठोक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
‘चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश आहेत. या देशाच्या घटनेचे रखवालदार आहेत, देशाच्या संविधानाचे चौकीदार आहेत. या राज्यातील घटनाबाह्य सरकार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या प्रेरणेनं आलेलं आहे. हे संविधान विरोधी सरकार आहे. पण ज्या पद्धतीने काल चंद्रचूड आणि प्रधानमंत्र्यांनी आरती केली, त्या आरतीतून सत्य स्पष्ट आहे की या देशातल्या घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देत आहे आणि देशासाठी ही धोक्याची घंटा आहे’, अशा अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली.
दरम्यान, पत्रकार परिषदेला संबोधित करताना संजय राऊत यांनी राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना ‘कोणतीही जागा महायुतीसाठी अजिक्य नाही, प्रत्येक जागेवर महायुतीला आव्हान आहे. मुंबईचं वातावरण सुद्धा महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आहे. जे चित्र लोकसभेत होतं तेच चित्र मुंबईच्या बाबतीत विधानसभेत किंबहूना जास्त जागा आम्ही जिंकू’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
भाजपचा सर्व्हे चुकीचा आहे. देवेंद्र फडणवीसांना आताच दम लागतो आहे. 12 ते 13 जागाच भाजपला मिळतील. संपूर्ण विदर्भात महाविकास आघाडीलाच अधिक जागा मिळतील. त्यासाठी आम्ही मेहनत करत आहोत. असं संजय राऊत म्हणाले.
भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही…
राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आज आंदोलन करत आहे त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टोला लगावला. ‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आरक्षणासंदर्भातील वक्तव्य भाजपने नेहमीप्रमाणे मोडून तोडून समोर आणलेलं आहे. आरक्षण रद्द करू असं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं नाही. भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही. त्यांना हवं आहे तितकंच ते ऐकतात आणि बाकीचं तोडून मोडून फेकून देतात. काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहित आहे. किंबहूना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षणाविषयची भूमिका काय हेही मला माहित आहे. जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे, समान न्यायाचे तत्त्व लागू होत नाही, दूर्बल समाजाल न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण राहील अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे’, असं त्यांनी स्पष्ट केलं.