बेईमानांना छातीवर घेण्यासाठी शिवसेनेची स्थापना झालेली नाही; नेत्यांच्या घरवापसीच्या चर्चा संजय राऊतांनी फेटाळल्या

शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून अडीच वर्षापासून ज्यांनी शिवसेनेवर उभा दावा मांडला, शिवसेना फोडली, महाराष्ट्राच्या दुष्मनांशी हातमिळवणी केली त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध, संवाद राहिलेला नाही आणि राहणार नाही. गेल्या अडीच वर्षात त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली. हजारो, लाखो निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले. आमच्या काही जागा थोड्या मताने पडल्या हे खरे असले तरी आम्ही 9 खासदार निवडून आणले. अशावेळी जे सोडून गेले त्यांची चिंता का करावी, असं स्पष्ट मत ठामपणे मांडत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी बाहेर गेलेल्या नेत्यांच्या तिथल्या नाराजीनंतर घरवापसीच्या चर्चा फेटाळल्या आहेत.

आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिवस आहे. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना केली, ती अशा बेईमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही. ज्यांनी मराठी राज्याशी, मराठी माणसाशी बेईमानी केली त्यांच्याशी संबंध ठेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष कधी पुढे नेला नाही. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीने बाळासाहेबांनी शिवसेना इथपर्यंत आणली आणि उद्धव ठाकरे यांनी पुढे नेली, असंही राऊत म्हणाले.

महायुतीची सर्व इंजिन बंद पाडून ‘मविआ’ विधानसभा जिंकेल; संजय राऊत यांचा ठाम विश्वास

दरम्यान, लोकसभेनंतर राज्यसभेतही डावलले गेल्याने भुजबळांच्या मनात खदखद असल्याची चर्चा आहे. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या मनातील खदखद, त्यांच्या पक्षातील खदखद असून त्याच्याशी शिवसेनेचा काही संबंध नाही. त्यांनी ही खदखद पक्षातील नेत्यांपुढे मांडावी. अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल हे त्यांचे नेते असून त्यांनी आपल्या मनातील खदखद त्यांच्यापुढे मांडावी’.

अजित पवार गटामध्ये नाराज असलेले नेते छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. मात्र या सर्व अफवा असून छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा राजकीय संवाद झालेला नाही आणि होण्याची शक्यताही नाही, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.