फडणवीस शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत; गुजरात व्यापार मंडळाला शिंदेंसारखा बिनकण्याचा राज्यकर्ता हवाय! – संजय राऊत

“एक फूल आणि दोन डाऊटफूल यांच्यात सुरू असलेला संघर्ष अख्खा महाराष्ट्र बघतोय. खरे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते. हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद यासाठी मिळाले की त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली. त्यांच्यामध्ये फार मोठे कर्तुत्व, कर्तबगारी आणि अनुभव आहे असे नाही. महाराष्ट्राची अवस्था दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे करून पैशाच्या थैल्याच्या थैल्या पोहोचवणारा बिनकण्याचा मुख्यमंत्री गुजरात व्यापार मंडळाला हवा असतो आणि ते त्याच पद्धतीने काम करताहेत”, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. बुधवारी सकाळी ते माध्यमांशी संवाद साधत होते.

अजित पवारांची मदत हवीय, त्यामुळे त्यांच्यावर टीका करू नये अशी विनंती भाजपने संघाला केली आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, “हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण 70 हजार कोटींच्या घोटाळ्याती मदत जर त्यांना होणार असेल आणि त्यांच्याबरोबरचे इतर सहकारी आहेत, ज्यांनी मिर्चीचा व्यापर केला, ज्यांनी बँकांसंदर्भात घोटाळा केल्याचा आरोप संघाचाच आहे, अशांच्या मदतीने हे सरकार आणि राज्य चालणार असेल तर भाजप आणि संघाला माझा कोपरापासून दंडवत.”

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात झालेल्या हायव्होल्टेड ड्रामावरही राऊत यांनी भाष्य केले. “अजित पवारांनी निधीसाठी जमिनी विकू का? असा सवाल केला. याचाच अर्थ राज्याची आर्थित परिस्थितीत ही हातात कटोरा घेतल्याप्रमाणे झालेली आहे. आंध्र प्रदेश आणि बिहारला धो-धो पैसा देत असताना दिल्ली आणि त्यांच्या चमचे मंडळाने मिळून कंगाल केलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मदत करावी असे त्यांना वाटले नाही”, अशी टीका राऊत यांनी केली.

दरम्यान, सीमाप्रश्नावर सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात हजर रहात नाहीत, असा आरोप सीमाभागातील लोकांनी केला आहे. हा आरोप खरा आहे. मी सीमाभागातील लढ्यातील सैनिक आहे अशी बोंब मुख्यमंत्री ठोकतात. सीमाभागात आमच्याबरोबर लढा दिला याचा पुरावा त्यांनी द्यावा. आमच्याकडे तुरुंगवास भोगलेल्या 49 जणांची यादी आहे. त्यात छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. सीमाभागासंदर्भात त्यांना खरच आस्था असेल तर राज्य सरकारचा वकील न्यायालयात हजर का रहात नाही? असा सवाल राऊत यांनी केला.

अजित पवार को गुस्सा क्यों आता है… पैसे कुठून आणू? जमिनी विकायच्या काय? मंत्रिमंडळ बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा

ते पुढे म्हणाले की, आधीच्या मंत्रीमंडळात चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सीमाभागाची विशेष जबाबदारी होती. पण छाती पुढे करत आम्ही लढाया लढलो, मराठी माणसासाठी, सीमाप्रश्नासाठी लढाया केले म्हणणारे शिंदे सुरक्षेच्या कारणास्तव एकदाही सीमाभागात गेले नाहीत. आम्ही गेलो. आम्हाला अटकही झाली. माझ्यावर खटलेही सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सीमाभागातील जनतेचे प्रश्न सुटतील याचा आपण विचारही करू शकत नाही, असेही राऊत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

यावेळी खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावरही कडाडून टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने पीडित अर्थसंकल्प असून एका जमान्यात गुजरातचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला आपला व्यापार वाचवण्यासाठी खंडणी द्यायचे. त्याच व्यापारी मंडळाने सत्ता वाचवण्यासाठी देशाच्या तिजोरीतून नितीश कुमार यांच्या बिहार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशला खंडणी दिली. नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे त्यांच्या पाठींब्याची पुरेपूर किंमत वसूल करत आहेत, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.