भाजपकडून लोकशाही ‘हायजॅक’, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर; संजय राऊत यांचा घणाघात

राज्याचे निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असे म्हणते. याचा अर्थ निवडणूक आयोगातच घोटाळा आहे. संपूर्ण जगाने ईव्हीएम नाकारले आहे. मग हे शहाणे आहेत का? राजीव कुमार निवृत्त झाल्यावर मोदी, शहा त्यांना राज्यपाल किंवा राजदूत असे एखादे बक्षीस देतील. सध्या हेच सुरू असून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील न्यायाधीश, घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून हवी ती कामे करून घ्यायची आणि मग त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षीसं द्यायची, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमशी झालेली छेडछाड तसेच मतमोजणीतील तफावतीबद्दल अनेक पुरावे देऊनही ईव्हीएम घोटाळ्यावर निवडणूक आयोगाने पुन्हा तेच तुणतुणे वाजवले. ईव्हीएम अमेरिकेत हॅक होऊ शकते… हिंदुस्थानात नाही, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत उत्तर देत होते.

ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये निवडणूक आणि ईव्हीएममध्येही घोटाळा झालेला आहे. निवडणूक आयोगाने मरकडवाडीला येऊन बसावे. तिथली जनता स्वखर्चाने बॅलेट पेपरने मतदान घेणार होती. तेच गाव, तेच मतदान.. मग बॅलेट पेपर आणि ईव्हीएमधील तफावत निवडणूक आयोगाला दिसली असती. पण या देशातील लोकशाही भाजपने हायजॅक केली आहे. ज्यांना लोकशाहीचे रक्षण करायचे आहे ते चाचेगिरी करत आहेत.

महाराष्ट्र, हरयाणाप्रमाणे दिल्लीतली मतदार यादीत घोटाळा होत आहे. निवडणूक आयोग यावर काहीच बोलत नाही. हजारोंच्या संख्येने नावं वगळायची, नवीन नावं घुसवायची आणि त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचे. गेल्या काही काळापासून हे वारंवार सुरू आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

अमेरिकेत ईव्हीएम हॅक होऊ शकते हिंदुस्थानात नाही, ईव्हीएम घोटाळ्यावर निवडणूक आयोगाचे तेच तुणतुणे

वन नेशन, वन इलेक्शन संदर्भात जेपीसीची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई उपस्थित राहतील आणि ते आपली भूमिका मांडतील. वन नेशन, वन इलेक्शनला आमचा विरोध असून हे लोकशाही, संविधानविरोधी आहे. हे हुकुमशाहूकडे नेणारे बील आहे, असेही राऊत म्हणाले.