राज्यात बोगस भरारी पथकांकडून वसुली सुरू; महिलांच्या पर्स, विद्यार्थ्यांची दफ्तरं उघडून तपास! – संजय राऊत

Pc - Abhilash Pawar

मुंबईसह महाराष्ट्रात बोगस भरारी पथकांकडून वसुली सुरू आहे. ऐन दिवाळीत रस्त्यावर गाड्या अडवून महिला, मुलांची तपासणी केल्याच्या तक्रारी येत आहेत, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून तपासणीसाठी नाक्यानाक्यावर निवडणूक आयोगाची भरारी पथके तैनात आहेत. धक्कादायक म्हणजे यात काही तोतया अधिकाऱ्यांची पथके घुसली असून नाकाबंदीच्या नावाखाली या तोतयांनी सामान्यांच्या नाकात दम आणला आहे. या नाकाबंदीत महिलांना टार्गेट करून नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी असून या बोगस नाकाबंदीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावर संजय राऊत यांनी परखड भाष्य केले.

निवडणुकीच्या माध्यमातून नाक्यांवर, चौक्यांवर कुणाच्याही गाड्या अडवल्या जात आहेत. तपासणी, भरारी पथकांच्या नावाखाली लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न होतोय, हे अत्यंत गंभीर आहे. महिलांच्या पर्स, विद्यार्थ्यांची दफ्तरं उघडून तपासणी केली जात आहे. महिलांच्या दैनंदिन वापरातील सामनाची तपासणी करणे, गाडीतून सामान बाहेर काढणे हे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत काय? 50-50 खोके पर्समधून पकडले जाणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला.

महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष आघाडी धर्म पाळणार! – संजय राऊत

तपास पथकांच्या नावाखाली बोगस पथके मुंबईसह महाराष्ट्रामध्ये काम करताहेत. त्यांच्याकडे बनावट, बोगस ओळखपत्र आहेत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वसुली केली असून बनावट ओळखपत्र बनवणारे कोण आहेत याचा तपास करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसात बोगस आधारकार्ड, वोटर्स भाजपकडून निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे ही बोगस यंत्रणा निर्माण करण्याचे काम भाजप किंवा शिंदे गट करत नाही ना अशी शंका आहे, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आमची हेलिकॉप्टर तपासली जातात. पण राज्याचे मुख्यमंत्री एकाचवेळी हेलिकॉप्टरमधून 20-20 बॅगा भरतात आणि उतरवतात. त्यात काय कपडे आणि अंडर गारमेंट्स आहेत का? भरारी पथक, निवडणूक आयोगाला ते दिसत नाही का? मुख्यमंत्री, मंत्री, भाजप नेत्यांच्या बँकांची तपासणी होत नाही, पण महिलांची पर्स, विद्यार्थ्यांची दफ्तरं उघडली जातात. हा कोणता तपास सुरू आहे? असा संतप्त सवालही राऊत यांनी केला.