बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावे अशी स्थिती! – संजय राऊत

एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लावण्याची तरतूद घटनेत नाही; पण सध्या बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावे अशी स्थिती आहे. बीडमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कधीही भडका उडेल, लोकं रस्त्यावर येतील, दंगल होईल अशाप्रकारचे वातावरण आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली.

बीडमधील जनतेचा शासन आणि प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं. ते गृहमंत्रीही आहेत. त्यांचे जे लाडके धनूभाऊ आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी बीडमध्ये जावं, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. बीड आणि परभणीत ज्या घटना घडल्यात त्यावर फडणवीस फक्त थातूरमातूर उत्तर देत आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणुसकीशून्य आहे, असे राऊत म्हणाले. मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात आहेत आणि तुमचेच मंत्री बीडमध्ये जाऊन नौटंकी करत आहेत, महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही मुर्ख समजला का, असा सवाल राऊत यांनी केला.