आमचा पक्ष चोरण्याचं, चिन्ह देण्याचं कांड अमित शहांनी केलं आहे. पण लक्षात घ्या, राजकारणात सगळ्यांचे दिवस येतात आणि हे लोक समुद्र मंथनातून अमृत पिऊन आलेले नाहीत. राम-कृष्ण सुद्धा आले आणि गेले. तसे अमित शहा आणि मोदीही जाणार, अशा खणखणीत शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.
संजय राऊत हे शनिवारी दुपारी नाशिक येथे दाखल झाले. त्यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच्या पक्ष बांधणीच्या संदार्भात बोलताना पक्षामध्ये काही बदल होणार असं सांगितलं.
‘पक्षामध्ये काही बदल नक्की होणार. ते फक्त नाशिकमध्ये नाही तर महाराष्ट्रात होणार. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनेक नवीन कार्यकर्ते आता पक्षाशी जोडले गेले आहेत. काही लोक हे मोह, माया, लोभ, लाभ यासाठी जात असतील, जात आहेत. रोज बातम्या येताहेत. जेथे जाताहेत ती खरी शिवसेना नाही हे सगळ्यांना माहित आहे. पण मोह कुणाला सुटला नाही अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. ज्यावेळी माननीय बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नेतृत्व करत होते तेव्हाही आम्ही अशा प्रसंगातून गेलेलो आहोत. पराभव पचवले आहेत. पण पक्ष उभा आहे. आजही मजबुतीने उभा आहे’, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
बटेंगे कटेंगे वाले स्वत:च काटले जातील!
‘विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला असं होत नाही. राजकारणात कुणीच संपत नाही. चंद्राबाबू नायडू मागच्या निवडणुकीत फक्त 16 आमदार निवडून आले होते. लोकशाही मध्ये आज कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, वैगरे असेल. पुढल्या वर्षभरामध्ये काय नवीन प्रकरणं येतील आणि बटेंगे कटेंगे वाले स्वत:च काटले जातील याचा राजकारणात भरोसा नसतो’, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
शिवसेना अनेक संकटातून पुढे गेली आहे!
काही नगरसेवक पक्ष सोडून गेल्याचं पत्रकारांनी म्हणताच संजय राऊत यांनी अगदी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. ‘काही नगरसेवक आधीच अन्य पक्षात गेले आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे की, बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की शिवसेना ही अस्वलासारखी आहे. अस्वलाच्या अंगावरचे 10,20 केस उपटले तरी अस्वलाचे केस कमी होत नाही. यासगळ्याचा विचार करून आम्ही पक्ष बांधणीचा वरती जोर देऊ. ज्यांना जायचं आहे ते गेले, सत्तेच्या मोहापायी गेले. हेच तर सगळं राजकारण केलं. यापुढे ज्यांना जायचं आहे त्यांना आम्ही कुणी मनधरणी करत बसलेलो नाही. इथे बसलेले खंबीरपणे काम करणार आहोत. अशा प्रकारचं नेतृ्त्व अनेक स्तरावर असल्याने शिवसेना अनेक संकटातून पुढे गेली आहे’, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, ‘महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा कुणी काम केलं नाही असं मी कधीही बोललो नाही. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळालेला निकाल आणि का मिळाला याची कारण मीमांसा वारंवार झाली आहे. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे दिल्लीत आहेत आणि EVM च्या विरोधात भेट घेण्याचा प्रयत्न करताहेत, त्यांच्याकडे प्रचंड पुरावे आहेत. कशाप्रकारे या निवडणुका प्रत्येक बूथ वर Sabotage करण्यात आल्या याचे पुरावे आहेत. पूर्वी काही लोक बूथ कॅप्चरींग करायचे आता EVM च्या माध्यामातून बूथ ताब्यात घेण्यात आले, याचा पुरावा घेऊन उत्तमराव जानकर हे दिल्लीत आहेत. पण निवडणूक आयुक्त भेटत नाहीत’, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. नाशिकला देखील तसंच झाल्याचंही ते म्हणाले. ‘नाशिकच्या दोन्ही जागा 100 टक्के आम्ही जिंकणार होतो. आमच्या तीनही पक्षांनी ‘जी जान से’ मेहनत केली. मतदारांचा कल आम्हाला होता. तरीही आम्ही पराभूत झालो असं चित्र निर्माण करण्यात येत असेल तर ते कृत्रिम चित्र आहे. बॅलट पेपरचे निकाल पाहा. तिथे ट्रेंड कळतो, असा खुलासा त्यांनी यावेळी बोलताना केला.
प्रत्येक महापालिकेतील प्रश्न, बांधणी वेगळी…
महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात बोलताना, ‘मुंबई संदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि इथलं राजकारण वेगळं असतं. 14 महानगरपालिका आहेत. प्रत्येक महापालिकेतील प्रश्न, बांधणी वेगळी आहे. नाशिकच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रमुख नेत्यांनी काही निर्णय घेताला आणि तो निर्णय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्यानंतर आम्ही त्यासंदर्भात निर्णय घेऊ. इथे स्वबळावर लढल्यानंतर आम्हाला भाजपचा पराभव करता येईल असं असेल तर आम्ही त्यावर विचार करू. त्या बाबतीत इथे बसलेले प्रमुख नेते विचार करतील, ते सगळं ठरवतील. ही आमची कार्यकारणी आहे. हे सगळे कोअर कमिटीतील लोक आहेत. ते मिळून आम्ही ठरवू. ते जर म्हणाले की स्वबळावर लढू तर तसं करू. ते म्हणाले आघाडीतून लढू तर तसं करू’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. ‘आभार कुणाचे? EVM चे? ठिकठिकाणी, चौकाचौकात EVMच्या प्रतिकृती उभारून धन्यवाद EVM म्हणूत ते आभार मानत चालले आहेत का? त्यांनी दोन गोष्टींचे आभार मानले पाहिजेत. निवडणूकीत वापरलेला अमर्याद ब्लॅक मनी, प्रशासकीय यंत्रणा आणि EVM यातून हा विजय झाला. ही निवडणूक घोटाळे करून जिकंण्यात आली आहे. ज्यांनी मतदान केलं त्यांचा विश्वास नाही या निकालावर. आभार कुणाचे मानता? EVM चेच आभार मानणार’, असा टोला लगावला.
तर चंद्राबाबू यांच्या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले ‘चंद्राबाबू यांनी पक्ष फोडला नव्हता तर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. पण एकनाथ शिंदे यांचा निकाल हा संशयास्पद आहे. भाजपचा निकाल देखील संशयास्पद आहे. शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा मिळतात आणि अजित पवारांना 42-45 जागा मिळतात. हा निकालच संशयास्पद आहे. या निकालावर राज्याच्या जनतेचा विश्वासच नाही. निवडणूक आयोगाशी हात मिळवणी करून त्यांनी आमचा पक्ष ताब्यात घेतला. एकनाथ शिंदेंनी पक्ष स्थापन केला का? बाळासाहेब ठाकरे यांना काय एकनाथ शिंदेंनी जन्म दिला का? सांगा ना! त्यांना पक्ष देण्याचं काम अमित शहा यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये अमित शहांचा फोटो हवा, बाळासाहेबांचा फोटो नको. हे जे सगळे बाळासाहेबांचे फोटो लावून फिरताहेत त्यांनी सगळ्यांनी देवघरात अमित शहांचे फोटो लावले पाहिजे. त्यांचं दैवत अमित शहा आहेत. आमचा पक्ष चोरण्याचं, आमचं चिन्ह देण्याचं हे सगळं कांड अमित शहांनी केलं आहे. पण लक्षात घ्या, राजकारणात दिवस सगळ्यांचे येतात आणि हे लोक समुद्र मंथनातून अमृत पिऊन आलेले आहेत का? अहो इथे राम-कृष्ण सुद्धा आले आणि गेले तसे अमित शहा आणि मोदीही आले आणि जाणार आहेत’, असं संजय राऊत म्हणाले.