देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र ‘पोलीस स्टेट’ बनलं, ‘टेरर’ हाच भाजपच्या यशाचा मंत्र; संजय राऊत कडाडले

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पोलीस स्टेट बनले आहे. पोलिसांना कोणतेही आदेश दिले जातात आणि पोलीस काहीही करतात, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. जयकुमार गोरे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात अराजक माजलेले आहे. काहीही करायचे आणि पोलिसांना ते निस्तरायला लावायचे. पोलिसांकडून खून करून घ्यायचे, हवे ते उद्योग करून घ्यायचे, लोकांना खोटे गुन्हे, खोट्या याचिका करायला लावायच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांची, तरुण नेत्यांची बदनामी करायचे हे धोरण भाजपचे आहे. टेरर निर्माण करणे हाच भाजपच्या यशाचा मंत्र आहे. काही दिवसांनी हे ईदी अमीनचे राज्य होईल, असा घणाघातही राऊत यांनी चढवला.

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा अहवाल समोर आला आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली आहे. आम्ही वारंवार तेच सांगत आहोत. पोलिसांच्या मारहाणीत त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृहखाते जबाबदार आहे. गृहमंत्री जबाबदार आहेत. गृहमंत्री वारंवार असे घडले नाही सांगताहेत, म्हणजे ते खोटे बोलताहेत. पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे. त्यामुळे यावर कारवाई कुणावर करायची. स्वत: गृहमंत्री प्रायश्चित्त घेणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला.

हे वाचा – पाकिस्तानात केक खाऊन आले, जमीन हडपणाऱ्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना जिलबी-फाफडा खाऊ घातला; भाजपचा केमिकल लोचा काय? – संजय राऊत

भाजप सत्तेवर आल्यापासून विधिमंडळ, संसदेचे अध:पतन

भाजप आमदार चित्रा वाघ यांनी विधिमंडळात वापरलेल्या भाषेचाही राऊत यांनी समाचार घेतला. महाराष्ट्रात आणि देशात भाजप सत्तेवर आल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये विधिमंडळाचे, संसदेचे अध:पतन झालेले आहे. नैतिकतेच्या आणि संस्कार, संस्कृतीच्या गप्पा भाजप नेहमी मारत आलेला आहे. पण काल विधिमंडळामध्ये तुम्ही जे पाहिले त्या अध:पतनाला भाजप जबाबदार आहे. हा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांचा पक्ष आहे, मोदी-शहांचा नाही. त्यांनी या पक्षाला संस्कार, नितिमत्ता दिली होती. पण आज देशात, राज्यात मन व्यथित करणाऱ्या घटना घडताहेत. काल जे काही घडले आणि ज्या अश्लील स्वरुपाच्या भाषेचा वापर झाला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

केंद्रात, राज्यात सरकार तुमचं; पोलीस तुमचे, मग पत्राचं नाटक कशाला? संजय राऊत यांचा रोखठोक सवाल

लाडक्या बहि‍णींचे पैसे आमदार, खासदारांच्या घरात

दरम्यान, आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. सर्व सोंगं आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही, असे म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये सध्यातरी देता येणार नाही हे स्पष्ट केले. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी सरकारचा समाचार घेतला. मंत्र्यांच्या खिशामध्ये खूप पैसे आहेत. साखर कारखान्यांना कोट्यवधींचा निधी मिळालेला आहे. मिंधे-अजित पवार गटातील आमदार, खासदारांना शेकडो कोटींचा निधी मिळालेला आहे. जे 2100 रुपये महिलांना द्यायचे आहेत, ते सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदार, खासदारांच्या घरात जात आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये; अजितदादा म्हणतात, सर्व सोंगं आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही