कोणतीही जागा महायुतीसाठी अजिंक्य नाही, महाविकास आघाडीसाठीच वातावरण अनुकूल! संजय राऊत यांचा विश्वास

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत हे सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना संजय राऊत यांनी राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना ‘कोणतीही जागा महायुतीसाठी अजिंक्य नाही, प्रत्येक जागेवर महायुतीला आव्हान आहे. मुंबईचं वातावरण सुद्धा महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आहे. जे चित्र लोकसभेत होतं तेच चित्र मुंबईच्या बाबतीत विधानसभेत किंबहूना जास्त जागा आम्ही जिंकू’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

भाजपचा सर्व्हे चुकीचा आहे. देवेंद्र फडणवीसांना आताच दम लागतो आहे. 12 ते 13 जागाच भाजपला मिळतील. संपूर्ण विदर्भात महाविकास आघाडीलाच अधिक जागा मिळतील. त्यासाठी आम्ही मेहनत करत आहोत. असं संजय राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही…

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आज आंदोलन करत आहे त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टोला लगावला. ‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आरक्षणासंदर्भातील वक्तव्य भाजपने नेहमीप्रमाणे मोडून तोडून समोर आणलेलं आहे. आरक्षण रद्द करू असं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं नाही. भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही. त्यांना हवं आहे तितकंच ते ऐकतात आणि बाकीचं तोडून मोडून फेकून देतात. काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहित आहे. किंबहूना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षणाविषयची भूमिका काय हेही मला माहित आहे. जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे, समान न्यायाचे तत्त्व लागू होत नाही, दूर्बल समाजाल न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण राहील अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे’, असं त्यांनी स्पष्ट केलं.