शरद पवार संसदीय राजकारणातील महामेरू, तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज; निवृत्तीच्या संकेतावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘कुठेतरी थांबले पाहिजे‘ असे म्हणत संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार संसदीय राजकारणातील महामेरू आहेत. तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज आहे, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शरद पवार हे संसदीय राजकारणातील महामेरू, भीष्मपितामह आहेत. जवळजवळ 60 वर्षापेक्षा जास्त ते संसदीय राजकारणात आहेत. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व संसदीय सभागृहात त्यांनी काम केले. त्यांच्याइतका संसदीय राजकारणाचा अनुभव असणारा नेते देशाच्या राजकारणात नाही. गेल्या काही काळापासून त्यांच्या मनात हे विचार येत असून दिल्लीत अधिवेशनावेळीही हा विचार मला बोलून दाखवला होता. पण वय हा विषय नसून अनुभव हा विषय आहे, असे आम्ही त्यांना समजावल्याचे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की, आपण आमच्या सर्वांसाठी संसदीय राजकारणात असणे हे मार्गदर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांनी काल पुन्हा एकदा जाहीरपणे हा विषय बोलून दाखवला. शरद पवारांचा जो प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातील आहे त्याचा फायदा महाराष्ट्राला, देशाला, समाजाला आणि राजकीय क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना अनेकदा होत असतो.

दिल्लीच्या राजकारण्यांनी महाराष्ट्र आणि देशाबाबत ज्या प्रकारचे राजकारण सध्याच्या केले त्यामुळे ते व्यथित आहेत असे दिसते. तरीही या सगळ्या वादळांना तोंड देत संसदीय राजकारणातला हा प्रमुख स्तंभ उभा आहे. आपण फक्त आहात तिथे ठामपणे उभे रहा आणि देशामध्ये आमच्यासारखे असंख्य लोक आहेत ज्यांच्या पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा. आम्ही लढायला तयार आहोत. हा महाराष्ट्र, देश आपल्याला वाचवायचा आहे, त्यासाठी आपल्यासारख्या सेनापतींची आम्हाला कायमची गरज आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नतद्रष्ट माणूस; मुंब्य्रात काय पाकिस्तानातही शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊत यांचा पलटवार

वय झाले आता थांबा असे शरद पवारांना म्हणणाऱ्या अजित पवार यांनाही संजय राऊत यांनी टोला लगावला. राजकारणामध्ये कुणाला थांबवायचे हे जनता ठरवते. जसे अजित पवारांच्या पत्नीला जनतेने लोकसभेलाच थांबवले. लोक मतदान करतात, निवडून देतात. मतदाराला महत्त्व आहे. अजितदादा सांगताहेत किंवा अन्य कुणी मिंधे सांगताहेत म्हणून कुणी कुणाला थांबवू शकत नाही. उद्याच्या निवडणुकीत त्याबाबतीची स्पष्टता होईल, असेही राऊत म्हणाले.