ईडीपासून सुटका मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो. ईडीपासून सुटका झाली मला वाटलं माझा पुनर्जन्मच झाला, असे विधान अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकामध्ये याबाबत उल्लेख केला आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून तपास यंत्रणांचा धाक दाखवूनच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. छगन भुजबळ यांच्या विधानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही रोखठोक प्रतिक्रिया दिली असून प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून पक्ष आणि नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा टोला लगावला.
एकनाथ शिंदेंपासून अजित पवारांपर्यंत हे सगळेच ईडीपासून बचाव करण्यासाठी, स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी पक्ष सोडून गेले. तसे नसते तर भाजपमध्ये जाताच प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेकांची संपत्ती मोकळी झाली नसती. ईडी आणि सीबीआयच्या फायली कपाटात बंद करून ठेवल्या नसत्या. हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह शिवसेनेतून फुटून गेलेल्या लोकांनी ईडीच्या भीतीनेच पलायन केले आहे. आता त्यांना भीती वाटत नाही. कारण मागच्या 2 वर्षात त्यांना जे काही साध्य करून घ्यायचे होते ते त्यांनी करून घेतले आहे. या सगळ्यांना मुलुंडचे नागडे पोपटलाल तुरुंगात टाकायला निघाले होते. आता त्यांचा आवाज बंद झाला आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
ईडीपासून सुटका मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट
ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ, त्यांचा पुतण्या तुरुंगात जाऊन आला. त्यांची प्रॉपर्टी अजूनही जप्त आहे. असे अनेक जण आहेत. प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता. म्हणून त्यांनी आपापल्या नेत्यांच्या, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. आता तुम्ही लपवाछपवी कशाला करताय. मी नाही त्यातली कडी लाव आतली. काही गरज नाही.
ईडीचा दबाव हेच पक्षफोडीमागचे मुख्य हत्यार
शिवसेनेच्या नेत्यांवरही दबाव होता का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, माझ्यासह अनेकांवर होता. मी हे तेव्हाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून कळवले आहे. ते पत्र रेकॉर्डवर आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्यावरही दबाव होता. रविंद्र वायकर पळून गेले. कालपर्यंत ते आमच्याबरोबर होते, दुसऱ्या दिवशी निघून गेले. फाईल बंद झाली. बीएमसीमधले किंवा इतर गुन्हे मागे घेण्यात आले. ईडीचा दबाव हेच पक्षफोडीमागचे मुख्य हत्यार होते, असा आरोपही राऊत यांनी केला.
मरण पत्करू पण शरण जाणार नाही
काम करणाऱ्या नेत्यांनी आपला पक्ष सोडायचा आणि भाजपच्या तंबुत जायचे असा दबाव असतो. पण आमच्यासारख्या लोकांचे अख्खे आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेले. आम्ही तोंडावर सांगितलेले आहे की, मरण पत्करू पण शरण जाणार नाही. पण काही कमजोर हृदयाचे लोक असतात. शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
आम्ही वाकलो नाही, झुकलो नाही
छगन भुजबळ यांच्या पुनर्जन्माच्या विधानावरही राऊत यांनी भाष्य केले. मी स्वत: त्या कारवाईतून गेलेलो आहे. आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आपण मनुष्य आहोत. पुनर्जन्म हे सगळे खोटं आहे. मुळात आम्ही मेलोच नव्हतो. आमचा आत्मसन्मान जिवंत होता. आम्ही वाकलो नाही, झुकलो नाही, ताठपणे उभे राहून लढत राहिलो आणि म्हणून आजही स्वाभिमानाने जिवंत आहोत, असे राऊत ठणकावून म्हणाले.