छत्रपती शिवाजी महाराजांना माफीवीर म्हणणाऱ्या भाजप खासदाराला कधी अटक होणार? संजय राऊतांचा संतप्त सवाल

समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांच्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याच मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं सदस्यत्व निलंबित करण्यात आलं होतं.

याचदरम्यान आता एका भाजप खासदारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ भाजपाचे राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत त्यांना माफीवीर म्हणताना दिसत आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या या खासदाराला कधी अटक होणार? असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या X अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी म्हणताना दिसत आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा पत्र लिहीत माफी मागितली होती.” हा व्हिडीओ शेअर करत संजय राऊत म्हणाले आहेत की, अबू आझमीवर कारवाई झाली, एकदम कडक, मस्त. पण छत्रपती शिवाजी महाराजांना माफीवीर म्हणणाऱ्या या अतीशहाण्या भाजपा खासदारावर गुन्हा दाखल करुन अटक का झाली नाही? अजूनही वेळ गेलेली नाही.कोरटकर, सोलापुरकर आणि या सुधांशू त्रिवेदी सारख्याना देखील आझमीचा न्याय का नाही? शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपा वाल्याना वेगळा कायदा आहे काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे.