दिल्ली श्रीनगर कटरा वंदे भारत ट्रेन त्वरित सुरू करा, संजय राऊत यांची मागणी

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटन थांबवण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातील लाखो पर्यटक जम्मू कश्मीरमध्ये अडकले आहेत. दरम्यान दिल्ली श्रीनगर कटरा वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 एप्रिलला होणार होते. मात्र ते झाले नाही. आता अडकलेल्या पर्यटकांना जम्मू कश्मीरमधून बाहेर काढण्यासाठी तत्काळ ही ट्रेन सुरू करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

”दिल्ली श्रीनगर कटरा वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते 19 एप्रिल रोजी होणार होते, आज हजारो पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत, विमान कंपन्या लुटमार करत आहेत, ही ट्रेन सेवा त्वरित सुरू करावी, जेणेकरून हजारो पर्यटक त्यांच्या राज्यात परतू शकतील, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.