अमित शहा अपयशी गृहमंत्री, नैतिकता शिल्लक असेल तर मोदींनी त्यांचा राजीनामा घ्यावा! – संजय राऊत

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. मंगळवारी डोडा जंगलात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत लष्कराच्या कॅप्टनसह 4 जवान शहीद झाले. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून अमित शहा अपयशी गृहमंत्री असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच नैतिकता शिल्लक असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांचा राजीनामा घ्यावा, असे आव्हानही दिले.

बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्याच क्षणाला जम्मू-कश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. मोदींच्या नव्या सरकारमध्ये तीच विटी आणि तोच दांडू आहे. गृहमंत्री म्हणून अमित शहा पाच वर्ष पूर्णपणे अपयशी ठरले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडूनही काही ठोस कार्य झाले नाही. आताही तेच अमित शहा गृहमंत्री आणि तेच राजनाथ सिंह संरक्षणमंत्री आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे आणि अमित शहा हात चोळत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणामध्ये व्यस्त आहेत. अमित शहा देशातील निवडणुका, खोके जमवणे, धमक्या देणे यात व्यस्त असून देशाचे शत्रू मात्र मोकाट आहेत.

अमित शहा आपल्या राजकीय विरोधकांना शत्रू समजतात. खरे तर त्यांनी जवानांची हत्या करणाऱ्यांना देशाचे शत्रू समजले पाहिजे. शहा यांनी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना खतम करण्यासाठी लावली, तीच ताकद जर जम्मू-कश्मीर, मणिपूरमध्ये देशाच्या शत्रुंना खतम करण्यासाठी लावली असती तर आज जवानांच्या हत्या पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती, असेही राऊत म्हणाले.

दोडाच्या जंगलात धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टनसह हिंदुस्थानचे चार जवान शहीद

नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून आजपर्यंत किमान 40 जवानांच्या हत्या झालेल्या आहेत. या हत्यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. मोदींमध्ये थोडी जरी नैतिकता असेल, जवानांप्रती प्रेम, आदर असेल तर त्यांनी अमित शहा यांच्याकडून गृहमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यापासून विरोधकांना पोटशूळ उठला आहे. त्यात शंकराचार्यांनी विश्वासघात करणाऱ्यांचाही समाचार घेतल्याने गद्दारांची पाचर बसली आहे. त्यामुळे शंकराचार्यांनी राजकीय विधानं करू नये असे उपदेश पाजले जात आहेत. यावरही राऊत यांनी भाष्य केले. शंकराचार्य दोन दिवस मुंबईत होते आणि नंतर ते वाराणसीला गेले. वाराणसीमध्येही त्यांना राजकीय विधानांबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर दिले की, आम्ही संन्यासी आहोत. राजकीय वक्तव्य करत नाही. पण राजकारण्यांनीही धर्माच्या मुद्दय़ात हस्तक्षेप करू नयेधर्मातील राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबला तर मी गॅरंटी देतो, राजकारणावर बोलणार नाही. एवढेच नाही तर ते असेही म्हणाले की, हिंदू धर्मात विश्वासघातास काही स्थान नाही. जर हिंदू धर्माच्या नावाखाली कुणी विश्वासघात करत असेल तर त्यावर बोलणे राजकारण नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)