
देशात दोनच हिंदुहृदयसम्राट झाले. एक वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या दोन हिंदुहृदयसम्राटांनी हिंदुत्वाला नवीन दिशा दिली. दोघेही देशातील हिंदुंचे प्रेरणास्थान राहिले आहेत. या दोघांनाही एकाचवेळी भारतरत्न द्यायला हरकत नाही. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक ठराव केंद्र सरकारला पाठवायला पाहिजे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी वीर सावरकर, तर कधी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरणास्त्रोत मानतात. ते सर्व काही आपल्या सोयीनुसार करतात. दिल्लीत मराठी साहित्य संमेलनात झालेल्या भाषणात मोदींनी वीर सावरकर यांचा संदर्भ दिला होता. त्यामुळे वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना एकाचवेळी भारतरत्न द्यायला हरकत नाही.
लोकसभा आणि विधानसभेला मतांची गणितं जुळावीत म्हणून देशाला माहिती नसलेल्या अनेक लोकांना भारतरत्नची खिरापत सरकारने वाटली. फक्त जातीय आणि राजकीय गणितं जुळवण्यासाठी भारतरत्न देण्यात आले. त्यामुळे भारतरत्नाचे अवमुल्यनच झाले. भारतरत्नची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन प्रखर हिंदुत्ववादी लोकांना भारतरत्न द्यायला पाहिजे. यात कसले अडथळे आहेत? असा सवाल राऊत यांनी मोदी सरकारला केला.
मोदी, शहा स्वयंभू असून हा विषय त्यांच्या अखत्यारीतील आहे. त्यांच्याकडे बहुमत असून त्या जोरावर त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. तर फडणवीस हे मुख्यमंत्री असून त्यांनी ठराव मंजूर करून ताबडतोब पाठवावा. खरे तर भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही राज्याच्या ठरावाची गरज नसते. पण महाराष्ट्राने आपले योगदान पूर्ण करावे. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेही महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. मोदींनी आतापर्यंत त्यांना भारतरत्न का दिला नाही याचा आम्ही खुलासा मागू, असे राऊत म्हणाले.