शुक्रवारी पहाटे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल-1 वरील छत कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अशीच एक घटना जबलपूर विमानतळावरही घडली. विशेष म्हणजे 450 कोटी खर्च झालेल्या जबलपूरच्या विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महिन्यांपूर्वी उद्घाटन केले होते. या घटनांचा उल्लेख करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. अमृतकाळ संपून मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाचा अशुभकाळ सुरू झाला आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. ते दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.
दिल्ली विमानतळावर झालेल्या दुर्घटनेबाबत भाष्य करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, देशातील सर्व प्रमुख विमानतळं मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. भारतीय जनता पक्षाला अर्थपुरवठा करणाऱ्या गुजरातच्या ठेकेदारांनी देशभरातील विमानतळं बांधलेली आहेत. आज फक्त दिल्लीतील विमानतळ कोसळले आहे का? तर नाही. जबलपूरचे विमानतळही कोसळले आहे. तीन महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी 450 कोटी खर्च झालेल्या या विमानतळाचे उद्घाटन केले होते.
दिल्लीच्या टर्मिनल-1 वरील विमानतळाचा काही भाग आज कोसळला. त्यापूर्वी पहिल्याच पावसात राम मंदिर गळू लागले. अख्खी अयोध्या नगरी पावसामुळे तुंबली. महाराष्ट्रात 17 हजार कोटी खर्चून निर्माण केलेल्या अटल सेतुला तडे पडले. या सरकारच्या वतिने जिथे जिथे मोदी यांनी हात लावला तिथे तिथे अशुभ घडले. ही अशुभाची सुरुवात मोदींच्या तिसऱ्या काळात सुरू झाली. अमृतकाळ संपला असून या देशाचा अशुभकाळ सुरू झालेला आहे हे स्पष्ट दिसतेय, असे राऊत म्हणाले.
नीट परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली असून तसे पत्रही देण्यात आले आहे. याबाबत आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भाषण देशातील घडामोडी, देशाचे भवितव्य याचे प्रतिबिंब मांडणारे नव्हते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे रोज भाषण करतात त्या भाषणाचा एक भाग त्या वाचत होत्या. विरोधकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत होत्या. नको त्या विषयांमध्ये हात घालून वाद निर्माण करत होत्या. आणीबाणीचा विषय पन्नास वर्षानंतर काढण्याचे काय प्रयोजन आहे? असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला.
सरकार आडमुठेपणाने वागत असेल तर…
नीटसारख्या विषयावर राष्ट्रपतींनी ठोस भूमिका घेतली नाही. देशातील लाखो विद्यार्थी, पालक रस्त्यावर आहेत. एक पिढी बरबाद होताना दिसतेय आणि देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री जे इतर सर्व विषयांवर बोलतात, मत व्यक्त करतात, टीका करतात, टिप्पणी करतात. त्यांनी पुढे येऊन नीटवरती किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावर बोलावे असे काही घडले नाही. खरे म्हणजे या देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवावे अशाप्रकारचा नीट परीक्षांचा घोटाळा आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेत अशी मागणी केली आहे की आजचे कामकाज थांबवा आणि नीट परीक्षांच्या घोटाळ्यावर चर्चा करावी व पंतप्रधानांनी या चर्चेला उपस्थित राहून आम्हाला उत्तर द्यावे. सरकार आडमुठेपणाने वागत असेल तर सरकारला इंडिया आघाडीची ताकद दाखवावी लागेल. लोकसभेमध्ये आता आमची जी ताकद आहे ती दुर्लक्षित करण्यासारखी नाही. सरकारला काठावरचे बहुमत आहे आणि भाजपला स्वबळावर बहुमत नाही. त्याच्यामुळे लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारला आम्ही आव्हान उभे करू.
…तरी महाराष्ट्राच्या जनतेने मोदींना पराभूत केले
अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? असे विचारले असता राऊत म्हणाले की, सरकारने अर्थसंकल्प आधीच फोडल्याचे दिसत आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि घडामोडीसंदर्भात काही वृत्तपत्रात ज्या बातम्या आल्यात त्यावरून अर्थसंकल्प फुटलेला आहे असेच दिसते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सांगितले की, हा या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. हे सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आहे. यानंतरच्या ज्या निवडणुका होती त्यानंतर हे सरकार दिसणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार दिसेल. अर्थसंकल्पातील घोषणा निवडणुकीसाठीच्या असतील. अशा घोषणा लोकसभा निवडणुकीत मोदींनी केल्या होत्या, तरी महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पराभूत केले, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
भाजपसोबत पुन्हा हात मिळवणार नाही
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टने विधिमंडळाकडे रवाना झाले. याची दिवसभर चर्चा सुरू होती. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, समोरासमोर आल्यावर राजकीय शिष्टाचारानुसार एकमेकांना नमस्कार केला असेल तर त्यात राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत पुन्हा हात मिळवणार नाही. आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही.
Delhi Rain Update : दिल्ली विमानतळावरील छत कोसळले, अनेक गाड्या दबल्या; एकाचा मृत्यू, 6 जखमी